सरकारी रुग्णालयांत केसपेपर, विविध चाचण्या होणार नि:शुल्क | पुढारी

सरकारी रुग्णालयांत केसपेपर, विविध चाचण्या होणार नि:शुल्क

राजन शेलार

मुंबई :  सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणार्‍या नागरिकांना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता राज्यातील आरोग्य केंद्रापासून ते सरकारी रुग्णालयांत अगदी केसपेपर काढण्यापासून ते विविध चाचण्या नि:शुल्क केल्या जाणार आहेत. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला असून, लवकरच तो मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी आणला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास राज्याचा 70 कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे.

आरोग्यसेवा महत्त्वाची व आपत्कालीन सेवा आहे. राज्यभर सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध स्तरांवर विविध प्रकारच्या आरोग्य संस्था काम करीत आहेत. राज्य सरकारची राज्यात 10 हजार 780 उपकेंद्रे आणि 1,906 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. राज्यात 23 जिल्हा रुग्णालयेही आहेत. ग्रामीण भागातील ही आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच आधार ठरत आहेत.
महागड्या उपचारांऐवजी सर्वसामान्य लोक सरकारी रुग्णालयांत जाणे पसंद करतात. राज्य सरकारी रुग्णालयांतील औैषधोपचारासाठी व निरनिराळ्या वैद्यकीय सुविधांसाठी आजपर्यंत नाममात्र शुल्क आकारण्यात येत आहे. 2015 मध्ये सरकारी रुग्णालयांतील शुल्क निर्धारित केल्यानुसार बाह्यरुग्ण नोंदणी 10 रुपये, आंतरुग्ण शुल्क 20 रुपये, हिमोग्लोबीन चाचणी 20 रुपये, लघवी चाचणी 35 रुपये आदी शुल्क आकारण्यात येते. या शुल्कापोटी आरोग्य विभागाकडे वार्षिक 70 कोटी रुपये जमा होतात.

…तर लवकरच होणार अंमलबजावणी

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर सरकारी औषध खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले. आरोग्य विभागतील बदल्या ऑनलाईन केल्या तसेच जनआरोग्य योजनेतील उपचाराची मर्यादा 5 लाख रुपये केली. त्यानंतर आता सरकारी रुग्णालयांतील सर्व तपासण्या, चाचण्या नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातला प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे. त्यानुसार लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.

Back to top button