आता उद्योग क्षेत्रासाठी कोरोना टास्क फोर्स : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | पुढारी

आता उद्योग क्षेत्रासाठी कोरोना टास्क फोर्स : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेदरम्यान उद्योगांचे चाक रुतले होते. मात्र, आता संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांची साखळी तुटू नये व यामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी राज्यातील उद्योग क्षेत्रासाठीही कोरोनाविषयक टास्क फोर्स स्थापन करावा. तसेच याचे नियंत्रण मुख्यमंत्री सचिवालय (सीएमओ) कार्यालयातून करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले.

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार-कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे लागेल, निर्बंध कडक करावे लागतील.

या उपाययोजना करून अर्थचक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोरोना प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) च्या पदाधिकार्‍यांशी दूरद‍ृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्‍त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती.

या ऑनलाईन बैठकीत सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी. त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेसवाणी, अश्‍विन यार्दी, राजेश शहा, केशव मुरुगेश, भारत पुरी, असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, डी. के. सेन, सुलज्जा फिरोदिया मोटवाणी,शरद महिंद्रा यांच्यासह अन्य उद्योजक सहभागी झाले होते.

राज्यात दररोज 1 हजार 300 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. येणार्‍या काळात कोरोनाचा संसर्ग वाढला तर ऑक्सिजनची मागणी वाढू शकते. त्यासाठी ऑक्सिजनची निर्मिती, साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक, सिलिंडरची आवश्यकता असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

डेल्टा प्लसमुळे काळजी घ्यावी लागणार असून, अनेक देशांनी डेल्टा प्लसच्या संसर्गामुळे पुन्हा निर्बंध लावण्यास सुरुवात केली असल्याचे ठाकरे म्हणाले. उद्योगांच्या प्रतिनिधींनी शासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे व उद्योगांच्या परिसरात कोव्हिडसुसंगत वातावरण राहील याची खात्री दिली.

तिसरी लाट अधिक धोकादायक : डॉ. व्यास

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, पहिल्या लाटेत 20 लाख, तर दुसर्‍या लाटेत 40 लाख रुग्ण आढळले. तिसर्‍या लाटेचा वेग कितीतरी जास्त असू शकतो.

पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणात संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. 25 टक्के लसी खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात येत असून, उद्योगांनी त्यांच्याशी बोलणी करून त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांचे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

Back to top button