नवाब मलिक : रेस्टॉरंटमधील जेवणासोबत क्रूझवर ड्रग्ज नेल्याचे पुरावे | पुढारी

नवाब मलिक : रेस्टॉरंटमधील जेवणासोबत क्रूझवर ड्रग्ज नेल्याचे पुरावे

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : क्रूझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेले त्यातूनच ड्रग्ज गेले होते. ते सगळे पुरावे समोर आणणार, असा गौप्यस्फोट करीत राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक बॉम्बगोळा टाकला. आज गोंदिया येथे पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे यांनी प्रायव्हेट आर्मी म्हणजेच आपले खासगी पथक तयार करून दहशत निर्माण केली होती, हे भक्कम पुराव्यांनिशी सिद्ध करणार आहे.

माझ्याकडे असलेले कायदेशीर पुरावे एनसीबीच्या महासंचालकांना पाठवणार आहे. इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल त्यांच्या कार्यालयातील आहेत. जागेवर जाऊन मुद्देमाल जप्त केला जात नाही. कार्यालयात आणून हे सर्व केले जाते. एका कोर्‍या कागदावर सह्या घेतल्या जात आहेत.

समीर वानखेडे याने आपले एक खासगी पथक तयार केले असून त्यामध्ये फ्लेचर पटेल, आदिल उस्मानी, के. पी. गोसावी, मनीष भानुशाली यांसारखे अनेक लोक आहेत. हे सर्व घरात घुसून ड्रग्ज ठेवत आहेत आणि लोकांना अडकवत आहेत. हा सगळा फर्जीवाडा असून याची संपूर्ण माहिती काढली असल्याचे मलिक यांनी सांगितले.

कालच फर्निचरवाला नावाच्या मुलीने तिच्या बहिणीला कसे अडकवले, त्यावेळी फ्लेचर पटेल उपस्थित होता हे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आणखी मोठा उलगडा होईल, असा विश्‍वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला

आर्यन सुटल्याचा आनंद

आर्यन खान सुटल्याचा मनापासून आनंद आहे. आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की, हा सर्व फर्जीवडा आहे. समीर वानखेडे यांनी ड्रग्जच्या प्रकरणात अनेकांना गुंतविले. असाच प्रकार हाही होता. जे दोषी होते त्यांना सोडले आणि आर्यन आणि काहींना अडकवले गेले. पण वस्तुस्थिती बाहेर येईल, असेही ते म्हणाले.

कुणाच्या बापालाही आम्ही घाबरत नाही

या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत ते सोशल मीडियावर लाल गाठोड दाखवत आहेत. मी काही बँका बुडविल्या नाही की कुठे चोरी केली नाही. जे चोर आहेत तेच माझ्याकडे बोट दाखवत आहेत, अशी जहरी टीकाही मलिक यांनी केली.

मी भंगारवाला आहे, पण चोर नाही. माझ्याकडे दहा वीस नाही, शंभर टन रद्दी आहे. कोणत्या हॉटेलचे कोण मालक आहेत आणि त्या हॉटेलमधील वस्तू क्रूझवर कशा गेल्या, क्रूझवर ड्रग्ज कसे गेले हे सर्व समोर येईल. आताशी मी नावे घ्यायला सुरुवात केलेली आहे. इतके का घाबरताय? असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.

Back to top button