मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईसह राज्यातील 36 पैकी 28 जिल्ह्यांत सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशी बारा तास दुकाने सुरू ठेवण्याची, तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघरमध्ये सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी होणार्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय होणे अपेक्षित आहे.
कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी किरकोळ दुकानदार व विक्रेत्यांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 असा 12 तास दुकाने उघडण्याची परवानगी देण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. किरकोळ विक्रेते व दुकानदारांना दिलासा देण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघरमध्ये सध्या 5 टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी दर आहे. त्यामुळे तेथे निर्बंधातून सूट देण्याबाबत सरकार काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे. तेथे सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. या ठिकाणी सर्वप्रकारच्या दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत दुकाने उघडण्याची परवानगी देण्याचा विचार सुरूआहे.राज्यभरात मागील महिन्याभरापासून तिसर्या किंवा त्यावरच्या स्तरातील निर्बंध कायम आहेत.
मात्र, रुग्णसंख्या कमी होत नसल्याने लॉकडाऊन अथवा निर्बंधाचा फायदा होत नाही, याकडे व्यापार्यांनी लक्ष वेधले आहे. ठिकठिकाणी व्यापार्यांनी दिलेल्या निवेदनांचा विचार करून निर्बंध कमी करण्यासह दुकानांच्या वेळा वाढविण्याबाबत बुधवारी होणार्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार आहे.
हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पर्यटनस्थळे, रेल्वे लोकल आदी ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने याबाबत मात्र कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
राज्यात काही भागात कोरोनाचा उद्रेक कायम असला, तरी राज्याच्या इतर भागात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र, तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल करण्यात न आल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापारीवर्ग त्रस्त आहेत. त्यामुळे राज्यभर सरसकट लागू केलेले तिसर्या स्तरातील निर्बंध पूर्णतः काढून घेत दिलासा द्यावा किंवा पुन्हा कडक लॉकडाऊन करावा, अशी विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे टोपेंनी म्हटले आहे.
व्यापार्यांचे 'वेट अँड वॉच'
कोल्हापूर : शहरातील सर्वच दुकाने सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याने व्यापार्यांनी 'वेट अँड वॉच' अशी भूमिका घेतली आहे.
शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याने यावेळी सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा व्यापार्यांना होती; पण जिल्हा प्रशासनाने शहर व जिल्हा असा स्वतंत्र प्रस्ताव तयार न करता एकच प्रस्ताव तयार केल्याने जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्के झाला. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश
व्यापार्यांचे 'वेट अँड वॉच'
पुन्हा चौथ्या टप्प्यात होऊन जीवनावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
इचलकरंजी येथील व्यापार्यांनी सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्धार केला होता. यातून प्रशासन व व्यापारी यांच्यातील संघर्ष वाढला. कोल्हापूर शहरातही सोमवारी काही ठिकाणी व्यापार्यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला; पण नंतर ही दुकाने बंद करण्यात आली. शहरातील चप्पल दुकाने, सराफ, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वस्तूंची दुकाने बंदच राहिली. हॉटेल व्यवसायावर अजूनही निर्बंध कायम असून, सध्या फक्त पार्सल सेवा सुरू आहे.
दरम्यान, चेंबर ऑफ कॉमर्सने जिल्हा प्रशासनाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे; पण त्याचबरोबर शहर आणि जिल्हा असा स्वतंत्र विचार करून शहरातील दुकाने सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.