

पुढारी ऑनलाईन : रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर बुधवारी (दि.१९) रात्री उशिरा दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मन पिळवटून टाकणारी दुर्घटना असल्याचे म्हणत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी ट्विट (Irshalwadi landslide) केले आहे. दरम्यान, इर्शाळवाडीत मदत कार्यासाठी दाेन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याचे त्यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजीक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड कोसळली. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून, अनेकांना सुखरूप बाहेर रलकाढण्यात यश आले आहे. दरम्यान, सतत पाऊस पडत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. या दुर्घटनेतील जखमींवर उपचार (Irshalwadi landslide) सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी मी प्रार्थना करतो, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे.
दुर्घटनास्थळी स्थानिकचे आमदार, नेते आणि ज्याठिकाणी बेसकँप करण्यात आला आहे. तेथे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असून, ते घटनेवर लक्ष ठेवून आहेत. या दुर्घटनेस्थळी कोणतेही वाहन जात नसल्याने २ हेलिकॉप्टर तैनात आहेत; पण हवामान खराब असल्याने अद्याप हेलिकॉप्टर टेकऑफ करता येत नाही. त्यामुळे मनुष्यबळ पाठवूनच या दुर्घटनेच्या ठिकाणी मदत पोहचवली जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत सूमारे ४८ कुटूंब असून, २२८ लोक या कुटूंबात असल्याची माहिती आहे. यामधील ५ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे. त्यामुळे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच जखमींवर उपचार सुरू आहेत, असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना राज्य सरकारकडून ५ लाखांचा मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवरील उपचारांचा संपूर्ण खर्च करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यातील दरड प्रणव क्षेत्रांची यादी करण्यात आली होती. यामध्ये इर्शाळवाडीचा समावेश नव्हता. यापूर्वी या भागात कधीच अशी दुर्घटना झाली नाही, असेही अजित पवार म्हणाले. या भागात सतत पाऊस सुरू असून काही प्रमाणात मदतकार्यात अडथळे येत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या हवामानाचा अंदाज घेऊन, मदतकार्य पोहचवले जात आहेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.
रायगड येथील इर्शाळवाडी गावात झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहोचले आहेत. याठिकाणाहून ते खालापूरनजीक इरशाळगड गावातील परिसरात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं नियंत्रण (Irshalwadi landslide) करीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र जनसंपर्कने ट्विटरवरून दिली आहे.