Sharad Pawar-Ajit Pawar meet : काका-पुतण्या भेटीने संभ्रम | पुढारी

Sharad Pawar-Ajit Pawar meet : काका-पुतण्या भेटीने संभ्रम

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकीकरणाच्या मोहिमेवर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Sharad Pawar-Ajit Pawar meet) यांनी समर्थक आमदारांसह पक्षाचे नेते शरद पवार यांची सोमवारी पुन्हा भेट घेत पक्ष एकत्र ठेवण्यासाठी पवारांना गळ घातली. मात्र, पवार यांनी मौनव्रत कायम ठेवले असून, ते विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी बंगळूरला रवाना झाले. दरम्यान, भाजपसोबत न जाण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले असले, तरी स्पष्ट भूमिका न मांडल्याने संभ्रम वाढला आहे. इकडे ‘मविआ’तील घटकपक्षांमध्ये काका-पुतण्याच्या वारंवार भेटींमुळे संभ्रम वाढला आहे.

काँग्रेसच्या विदर्भातील नेत्या आणि माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी शरद पवार-अजित पवार यांच्या भेटसत्रांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भेटीची ही मालिका चुकीची आहे, अशा शब्दांत यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे.

अजित पवार समर्थक मंत्री आणि आमदारांच्या सलग दोन दिवस शरद पवार यांच्यासोबतच्या गाठीभेटी आणि पवारसुद्धा त्यांना सहज उपलब्ध होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. अशा स्थितीत अडचणीतून मार्ग काढण्याबाबत अजित पवार समर्थक नेते आणि आमदारांकडून पवार यांना साकडे घातले गेल्याने या संभ्रमात आणखी भर पडली आहे.

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये भेट घेतल्यानंतर सोमवारी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित होताच अजित पवार समर्थक मंत्री आणि आमदारांनी भेट घेतली.

या भेटीचे नेतृत्व प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे आदी नेते आले असताना पवार यांनी त्यांच्यासोबत थेट चर्चा केली नाही. याबाबतची माहिती त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना देत प्रतिष्ठानमध्ये येण्याचे आदेश दिले.

पाटील आणि आव्हाड आल्यानंतर पटेल यांनी पवार यांची मनधरणी केली. मात्र, दुसर्‍या दिवशीही त्यांनी मौन बाळगले. या भूमिकेवरून पवारांच्या मनाचा अंदाज कोणालाही घेता आला नाही.

साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो : प्रफुल्ल पटेल (Sharad Pawar-Ajit Pawar meet)

पवार यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले, रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष आणि खासदार तटकरे यांनी पवार यांची भेट घेतली होती. रविवारी सगळे आमदार आपापल्या मतदारसंघांत होते. सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे बरेच आमदार उपस्थित झाले. त्यामुळे पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला उपस्थित असल्याचे समजल्यावर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली. आजही पवार यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले असले, तरी त्यांच्या मनात काय आहे, हे मी कसे सांगू शकतो. पक्ष एकसंध राहावा, या दिशेने पवार यांनी विचार करावा, अशी भावना पटेल यांनी व्यक्त केली.

अजित पवार समर्थक निघून गेल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय अडचणीतून मार्ग काढा, अशी विनंती त्या गटाच्या आमदारांनी पवार यांच्याकडे केली आहे. त्यावर पवार यांनी त्यांना मागील निवडणुकांची आठवण करून दिली. आपण काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुका लढलो होतो; तर शिवसेनेसोबत महाविकास आघाडीच्या माध्यमातून अडीच वर्षे सत्तेत होतो. त्यामुळे अलीकडे निर्माण झालेल्या राजकीय अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हीच मार्ग सुचवा, असे पवार यांनी आमदारांना सांगितल्याची माहिती पाटील यांनी दिली.

फुटून गेलेल्या आमदारांनी त्यांचा गट स्थापन केला नाही. तसेच पक्षातील काही लोक सत्तेत गेले असले, तरी पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षामध्येच आहे.

राजकारणात संवाद बंद करायचा नसतो. त्यामुळे सत्तेतील मंडळी भेटायला आली, तर त्यावर टिपणी करणे योग्य नाही. ते नाराज होते का, ते निराश होते का, हे त्यांनाच विचारा. तसेच प्रत्येक भेटीचे पवार यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे नाही. जे भेटायला येतात, त्यांना पवार भेटतात. आतापर्यंत विधानसभेचे 20 ते 22, तर विधान परिषदेचे 4 आमदार त्यांना भेटून गेले आहेत, असा दावाही पाटील यांनी केला.

Back to top button