अजित पवार समर्थक 12 आमदारांना नोटीस | पुढारी

अजित पवार समर्थक 12 आमदारांना नोटीस

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सोमवारपासून सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधार्‍यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. दरम्यान, अजित पवार समर्थक बारा आमदारांना राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

पावसाने हात आखडता घेतल्यामुळे संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवर वाढलेले अत्याचार, बेरोजगारी इत्यादी मुद्दे उपस्थित करत विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार असला, तरी या बहिष्कारामागे राजकीय कारण आहे. भाजपने अगोदर शिवसेना आणि आता राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षांचे आमदार फोडले आहेत. काँग्रेसच्या आमदारांसाठीही गळ टाकला आहे. त्यामुळे संतप्त झालेले विरोधक सत्ताधार्‍यांच्या चहापानापासून दूर राहणार आहेत.

विधान परिषदेेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात रविवारी दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रतोद जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजता चहापानावरील बहिष्कार अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे.

अजित पवार समर्थक 12 आमदारांना नोटीस

शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये 5 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीला गैरहजर राहणार्‍या अजित पवार समर्थक बारा आमदारांना राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. आमदार सरोज अहिरे यांनी पाठिंबा दर्शविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील आमदारांची संख्या आता 36 पर्यंत पोहोचली असल्याचे बोलले जात आहे, तर शरद पवार गटाने आपल्यासोबत 17 आमदार असल्याचा दावा केला आहे.

‘व्हिप’ कुणाचा… राष्ट्रवादीत संघर्ष

शरद पवार गटाने प्रतोदपदी नुकतेच नियुक्त केलेले जितेंद्र आव्हाड यांनी हिवाळी अधिवेशनात आपलाच ‘व्हिप’ चालणार असल्याचा दावा केला आहे, तर या दाव्याविरोधात अजित पवार गटाने शड्डू ठोकला आहे. अधिवेशन कालावधीतील सर्व बैठका आणि आमदारांच्या उपस्थितीबाबत आपणच ‘व्हिप’ काढणार असल्याचे या गटाचे अनिल पाटील म्हणाले आहेत. या झुंजीमुळे शिवसेनेप्रमाणे आता या राष्ट्रवादीच्याही ‘व्हिप’चा प्रश्न निर्माण होणार आहे. अजित पवार यांनी रविवारी आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी अनिल पाटील यांच्याकडून ‘व्हिप’ जारी करण्यात येणार आहे. इतकेच नाही, तर हा ‘व्हिप’ शरद पवार यांच्यासोबतच्या आमदारांनाही बजावला जाणार आहे. याबाबतची कुणकुण लागल्यामुळे शरद पवार गटानेही आपल्या समर्थक आमदारांची बैठक आयोजित केली आहे.

Back to top button