पेणमध्ये शाडूच्या 30 लाख गणेशमूर्तींची निर्मिती

पेणमध्ये शाडूच्या 30 लाख गणेशमूर्तींची निर्मिती
Published on
Updated on

अलिबाग,जयंत धुळप : अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाकरिता पेण शहर आणि तालुक्यातील गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये मोठी लगबग सुरू आहे. यंदा पेण तालुक्यातील 3,000 मूर्तिकार आणि दोन लाख संबंधित कारागीर यांच्या माध्यमातून 80 लाख गणेशमूर्तींची निर्मिती सुरू आहे. यात शाडूच्या 30 लाख मूर्तींचा समावेश असून, शाडूच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. यंदाचा अपेक्षित एकूण व्यवसाय 300 ते 350 कोटी रुपयांचा होणार आहे. यंदा एकूण गणेशमूर्तींपैकी 40 टक्के गणेशमूर्ती शाडूच्या मातीपासून, तर 60 टक्के गणेशमूर्ती 'पीओपी'पासून तयार होत आहेत. ही माहिती श्री गणेश मूर्तिकार प्रतिष्ठान या मूर्तिकारांच्या राज्यस्तरीय संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे यांनी दै. 'पुढारी'ला दिली.

यंदा अंगारक योग साधून भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वांची लाडकी देवता असणार्‍या श्री गणरायांचे आगमन होणार आहे. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती पेणमधील गणेशमूर्तिकारांनी गेल्या दोन वर्षांपासून तयार करण्यास प्रारंभ केला असून, यंदादेखील शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. पेण शहरातील सुमारे 600 गणेशमूर्ती कार्यशाळांतून यंदा सुमारे 30 लाख गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये सुमारे 12 लाख गणेशमूर्ती या शाडूच्या आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत शाडूच्या गणेशमूर्तींच्या मागणीतदेखील वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याचे पेणमधील प्रसिद्ध गणेश मूर्तिकार आणि दीपक कला केंद्राचे संचालक नीलेश समेळ यांनी सांगितले.

गणेशमूर्ती निर्मिती व्यवसाकरिता बँकांकडून 80 कोटींचे कर्ज

पेण तालुक्यातील हमरापूर गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळ ही गणेशमूर्तिकारांची सर्वात मोठी संघटना आहे. संघटनेचे सद्यस्थितीत 650 मूर्तिकार व कार्यशाळा संचालक सदस्य आहेत. संघटनेचे अध्यक्ष किरण दाभाडे यांनी गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायाचे अर्थकारण सांगताना सांगितले की, कोरोना लॉकडाऊनच्या वर्षी गणेशमूर्तिकारांनी विविध बँकांकडून 65 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते; पण त्यावर्षी केवळ 30 कोटींचाच व्यवसाय होऊ शकला. त्यामुळेही बँकांच्या हप्त्यांचे ओझे डोक्यावर होते. परंतु, गेल्यावर्षीच्या व्यवसायातून आर्थिक गाडी काहीशी रुळावळ येत आहे. यंदा गणेशमूर्तिकारांनी बँकांकडून सुमारे 80 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. दरम्यान, यंदा एकूण गणेशमूर्तींपैकी 40 टक्के गणेशमूर्ती शाडूच्या मातीपासून, तर 60 टक्के गणेशमूर्ती 'पीओपी'पासून तयार होत आहेत. यंदा कच्च्या मालाच्या दरात 35 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तींच्या किमतीत 18 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news