शेजारी खबरी झाला अन् ‘तो’ अडकला! | पुढारी

शेजारी खबरी झाला अन् 'तो' अडकला!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : २६ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी त्याच्या शेजाऱ्याला खबरी बनविले. आणि त्याच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेतले. ही घटना मुंबई अँटॉप हिल येथील असून भाऊसाहेब तिजोरे असे आरोपीचे नाव आहे. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात तो फरार होता.

१९९७ मध्ये भाऊसाहेब तिजोरे याने एका महिलेला स्वस्त दरात कर्ज देण्याच्या नावाखाली ५ लाखांचा गंडा घातला होता. अटक झाल्यानंतर जामीन मिळाल्यावर तो फरार झाला. कुर्ला येथील दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यावर तो मूळ गावी राहत असल्याची माहिती मिळाली. मात्र तिथे चौकशी केल्यास तो होऊन पळून जाण्याची शक्यता होती. यामुळे पोलिसांनी हवालदार विनोद भोसले यांना त्याच्या मूळ गावी पाठविले, पण तिजोरे माहिती अधिकार टाकून अनेकांना त्रास देत असल्याने त्याच्याबद्दल माहिती मिळत नव्हती. दोन वर्षांपूर्वी शेजाऱ्याने त्याच्या विरोधात तक्रार केली होती. भोसलेंनी संपर्क साधल्यावर त्याने तिजोरेची माहिती देण्यास नकार दिला. मात्र पोलिसांनी विश्वास देऊन त्याला खबरी बनवले आणि तिजोरेला अटक केली.

Back to top button