सीमा हैदर परतली नाही, तर पुन्हा एकदा ‘26/11’ | पुढारी

सीमा हैदर परतली नाही, तर पुन्हा एकदा ‘26/11’

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर हिला परत पाकिस्तानात न पाठवल्यास पुन्हा एकदा 26/11 सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतील हेल्पलाईन क्रमांकावर आला आहे. हा संदेश फसवा असण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांनी या धमकीची दखल घेऊन शहरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. तसेच, या धमकीचा अलर्ट राज्य आणि केंद्रातील तपास व गुप्तचर यंत्रणांना देण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर एका अज्ञात क्रमांकावरून उर्दूमध्ये व्हॉट्सअ‍ॅप संदेश आला. नंबरची सुरुवात +1(929) या देश कोडने आहे. पाकिस्तानी असल्याचा दावा करणार्‍या संशयिताने सीमा हैदर परत आली नाही, तर भारत नष्ट होईल. 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याच्या पुनरागमनासाठी स्वतःला तयार करा. यासाठी उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल, संदेशात म्हटले आहे.

सीमा भारतात आल्यानंतर पाकिस्तानकडून तिच्या या निर्णयाचा विरोध होत असून काही भारतीय नागरिकांकडून तिच्या कृतीचे समर्थन केले जात आहे. काहींनी ती पाकिस्तानी एजंट असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, सीमा हैदरला परत पाठवण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तानातील तिच्या नवर्‍याकडून करण्यात येत आहे. हा पेच सुरू असतानाच मुंबई पोलिसांना आलेल्या संदेशामुळे पुन्हा खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांसह सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.

कोण आहे सीमा हैदर?

पाकिस्तानी नागरिक असलेली सीमा हैदर ही महिला पब्जी खेळादरम्यान उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील सचिन मीना नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. आपल्या नवर्‍याला सोडून ती मुलांना सोबत घेऊन नेपाळमार्गे अवैधरीत्या भारतात आली आहे. याची माहिती मिळताच ग्रेटर नोएडा पोलिसांनी हैदरला इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन करून भारतात प्रवेश केल्याबद्दल अटक केली, तर तिला आश्रय दिल्याबद्दल सचिन मीना आणि त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती.

Back to top button