मुंबई ; पुढारी डेस्क : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीमच असल्याचा दावा त्यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. कुरेशी म्हणाले, हे लग्न ठरवून करण्यात आले होते, ते लव्ह मॅरेज नव्हते. दोन्ही कुटुंबे एकमेकांना चार-पाच वर्षांपासून ओळखत होती. वानखेडे जर हिंदु असते तर आम्ही या लग्नाला संमतीच दिली नसती.
वानखेडे कुटुंबिय आमच्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले. तेव्हा ते मुस्लीम म्हणूनच आले होते. त्यावेळी समीर यूपीएससीचा अभ्यास करत होते. आता ते हिंदु असल्याचे आम्हाला माध्यमांकडून कळाले, असेही डॉ. कुरेशी म्हणाले. काही वर्षांनंतर दोघांचा तलाक झाला. पण आम्ही हा विषय चव्हाट्यावर आणला नव्हता. समीर यांची आई मुस्लीम पद्धतीनेच सर्व गोष्टी करत होत्या, असेही डॉ. कुरेशी यांनी सांगितले.
समीर यांची आई झायदा यांच्याशी लग्न करतेवेळी ज्ञानेश्वर वानखेडे यांनी धर्मांतर करत मुस्लीम धर्म स्वीकारला होता. मुस्लीम धर्म स्वीकारल्याशिवाय हे लग्न झालेच नसते. ज्ञानेश्वर वानखेडे सध्या दाखवत असलेली कागदपत्रे त्यांच्या लग्नापूर्वीची आहेत. झायदा यांच्याशी लग्न झाल्यानंतर ज्ञानेश्वर हे दाऊद झाले. तथापि लग्न करतेवेळी दाऊद मुस्लीमच होते. त्यांच्या घरी मुस्लीम प्रथा पाळली जात होती, असेही डॉ. कुरेशी शेवटी म्हणाले.