Maharashtra Political Crisis : खोटं बोललो, तर पवारांची औलाद नव्हे : अजित पवार | पुढारी

Maharashtra Political Crisis : खोटं बोललो, तर पवारांची औलाद नव्हे : अजित पवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  खोटं बोललो, तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे घणाघाती वक्तव्य करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज काका शरद पवार यांनी 1978 च्या ‘पुलोद’ प्रयोगापासून ते 2014 आणि 2019 या सालामध्ये घेतलेल्या उलटसुलट निर्णयांचा गौप्यस्फोट केला. 2014 मध्ये वरिष्ठ नेत्यांनी (पवार) भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. शपथविधीला जायला सांगितले. भाजपसोबत जायचे नव्हते, तर शपथविधीला का पाठवले? असा सवाल करीत त्यांनी 2017 मध्ये भाजपशी हातमिळवणी करण्याची चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट केला. 2019 मध्ये एका उद्योगपतीच्या घरी भाजप नेत्यांसमवेत सरकार स्थापण्यावर चर्चा झाली; पण अचानक बदल होऊन शिवसेनेसोबत जायला सांगितले. आधी शिवसेना जातीयवादी होती. ती अचानक जातीयवादी राहिली नाही आणि भाजप जातीयवादी कसा झाला? असा खडा सवालही त्यांनी केला.

राष्ट्रवादीवर ही वेळ का आली? आपण सगळ्यांनी इतके दिवस… मला आठवतंय एकंदरीतच मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना साहेबांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली मी तयार झालो. घडलेलो आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. शरद पवार आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. आपल्या प्रत्येकाचे तेच मत आहे; पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे… एकंदरीतच आज जे देशपातळीवर आणि राज्यपातळीवर राजकारण चालले आहे! शेवटी एखादा पक्ष आपण कशाकरिता स्थापन करतो.

लोकांची विकासाची कामे होण्याकरिता… भारतातील सर्व जाती-धर्मांना न्याय देण्यासाठी काम पक्ष करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे, त्या संविधानाचा आदर करण्यासाठी… सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न होते. ते स्वप्न आपल्याला लोकशाहीमध्ये साकार करता आले पाहिजे, याकरिता आपण काम करत असतो. मी फार मागे जाणार नाही, आपल्या वरिष्ठ नेत्यांनी सुरुवात 1962 ला केली. विद्यार्थिदशेमध्ये असताना 1972 ला राज्यमंत्री झाले, 1975 ला मंत्री झाले; पण 1978 ला अशाच पद्धतीने एक प्रसंग उद्भवला आणि त्यावेळेस आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार बाजूला करून 1978 ला ‘पुलोद’ स्थापन केला. त्यावेळेस शरद पवार 38 वर्षांचे होते. त्या दिवसापासून महाराष्ट्राने साथ दिलेली आहे. आम्ही राजकीय जीवनामध्ये आलो. आपण सगळ्यांनी साथ दिली. 1978 चा काळ गेला. 1980 चा काळ आला. 1980 ला पुन्हा इंदिराजींची लाट आली. ‘पुलोद’ जनसंघामध्ये सामील होता… जो आता भाजप आहे. उत्तमराव पाटील मंत्रिमंडळामध्ये होते. इतरही शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. गणपतराव देशमुख होते. सगळेजण तुम्ही काँग्रेसमध्ये आलात. सरकार गेले. निवडणुका झाल्या.

आणीबाणीनंतर 77 मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. 77 ला देशपातळीवर निवडून आलेला जनता पक्ष आता कुठे आहे का? शोधावा लागतो… करिष्मा असणारा नेता त्या पक्षाला नव्हता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 80 चा उल्लेख केला. 85 ला पुन्हा त्यावेळेस सुरुवातीला समांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पक्ष पवार यांनी काढले. आपण सगळ्यांनी साथ दिली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 85 ला काय? पुन्हा आपण विरोधी पक्षांमध्ये गेलो. मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो. इथं बसणार्‍या माझ्या प्रत्येक महिलेचा, प्रत्येक तरुणाचा वडीलधार्‍यांचा काळ असतो. आपण साधारण वयाच्या 25 पासून 75 पर्यंत उत्तम पद्धतीने काम करू शकतो. समाजाकरिता काही तरी करून दाखवण्याची जिद्द असते, अशा पद्धतीने प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतेच, असे नाही. परंतु, हे सगळे घडत असताना काय झाले मला माहीत नाही. आम्हाला सांगण्यात आले, 8 डिसेंबर 1986 रोजी आताचे संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद… तिथे तिथल्या ग्राऊंडवर समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन झाली. का झाली? नेत्यांनी ठरवले झाली? दोन वर्षे नेत्यांना पद मिळाले नाही; परंतु 1988 ला राजीव गांधींनी पंतप्रधान असताना मुख्यमंत्रिपद दिले. 1988 ते 90 एकत्र काँग्रेसमध्ये राहिलो. 1990 ला पुन्हा निवडणुका झाल्या. पूर्ण बहुमताने आले नाही. अपक्षांनी साथ दिली. 1991 ला राजकारण बदलले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बारामतीकरांनी खासदार केले. त्यावेळी एक दुर्दैवी घटना घडली आणि राजीव गांधी आपल्यातून निघून गेले आणि एक लाट आली.

त्यामध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांना पंतप्रधान व्हावे लागले. 1991 पी. व्ही. नरसिंहराव यांनी सांगितले, पवार तुम्ही केंद्रात या! त्यावेळी पवार केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेले. त्याच्यानंतर बॉम्बस्फोट झाले. महाराष्ट्र पेटलाय, तुम्ही पुन्हा महाराष्ट्रात जा. दुर्दैवाने 1995 ला आपले सरकार गेले. मनोहर जोशी, नारायण राणे मुख्यमंत्री झाले. तो काळ आपण बघितला. 99 ला निवडणूक घेतली, तेव्हा काँग्रेस एकत्र होती. त्यानंतर सोनिया गांधी परदेशी आहेत, असे सांगितले. परदेशी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही, असे सांगितले. आम्ही ऐकले. 1990 ला 10 जूनला छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला. हे झाल्यानंतर चार महिन्यांतच निवडणुका लागल्या. त्यावेळी संपूर्ण मैदान गाजवण्याचे काम भुजबळ यांनी केले. त्यानंतर आर. आर. पाटील, सुनील तटकरे, जयंत पाटील, मी आम्ही सर्व तरुण होतो. काही तरी करावे आम्हाला वाटत होते. सुजलाम्-सुफलाम् महाराष्ट्र घडवायचा होता; पण त्यावेळी आपल्याला फक्त 58 जागा मिळाल्या. काँग्रेसला राज्यात नेतृत्व नसताना 75 जागा मिळाल्या. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले. आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळात काम केले. मला पहिल्या टर्मला फक्त सात जिल्ह्यांचे खाते मिळाले. मी खाते पेलले.

आता प्रशासनावर माझी पकड आहे की नाही, हे महाराष्ट्र जाणतो

प्रशासनावर माझी पकड आहे की नाही, हे महाराष्ट्र जाणतो. मी कधी जाती-पातीचे राजकारण केले नाही. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करतो. हे सगळे कशासाठी महाराष्ट्र? देशात पहिल्या नंबरचे राज्य म्हणून सर्व क्षेत्रात ओळख झाली पाहिजे. 2004 साली आपले 71 आमदार निवडून आले. काँग्रेसचे 69 आमदार आले. मला 2004 साली एवढे मोठे महत्त्वाचे स्थान नव्हते. त्यावेळी सोनिया गांधी यांनी विलासराव देशमुख यांना सांगितले. त्यांच्या सगळ्यात जास्त जागा आल्या आहेत. आता त्यांना आपल्याला मुख्यमंत्रिपद द्यावे लागेल. त्यावेळी आम्हाला विलासराव यांनी सांगितले, आता तुमच्यामध्ये कोण होईल; पण त्यावेळी 4 मंत्रिपदे जास्त घेऊन आलेली संधी घालवली. ही संधी घेतली असती, तर आजपर्यंत तुम्हाला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री दिसला असता. मला मनापासून वाटत होते, आपला पक्ष वाढला पाहिजे. खासदारांची संख्या वाढली पाहिजे, आमदारांची संख्या वाढली पाहिजे. कारण, एक चक्र असते. 25 वर्षांनी नवी पिढी पुढे येते, 50 वर्षांनी दुसरी पिढी, 75 वर्षांनी तिसरी पिढी पुढे येते. हे चक्र वर्षानुवर्षे चालणारे आहे.

भाजपने 2014 ला सांगितले होते की, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने 16-16-16 जाग्या लढवाव्यात. नितीन गडकरी यांची इच्छा होती; मात्र तसे होऊ शकले नाही. मंत्रिमंडळामध्ये आता नऊजणांना संधी मिळाली आहे. वेगवेगळी खाती आपल्याला मिळणार आहेत. वैयक्तिक कुणाच्या स्वार्थासाठी हा निर्णय घेतलेला नाही. काही आमदार दवाखान्यात आहेत. काही येऊ शकले नाहीत. सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात माझी प्रतिमा एक दबंग देता, एक कडक नेता, अशी आहे. स्वतःला पाहिजे तेच करतो, असा नेता, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे; पण मी तसे होऊ देणार नाही. सर्व जाती-धर्माला, माझे आदिवासी असतील, माझे मागासवर्गीय बांधव असतील, महिला असतील, तरुण असतील, कुणाशीच भेदभाव नाही. बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, ती आपल्याला कमी करायची आहे. बेरोजगारी कमी करण्याकरिता उद्योगधंद्याला पोषक असे वातावरण करायचे आहे. विरोधी पक्षात बसून ते वातावरण होऊ शकत नाही.

देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या!

प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांचे बोलणे झाले. 2014 साली भाजपला बाहेरून पाठिंबा देतो, असे सांगितले. आम्ही गप्प बसलो, का तर नेत्यांचा निर्णय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. 2014 साली वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितले. आम्ही गेलो. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले. त्यांनी आमची विचारपूस केली. भाजपसोबत जायचे नव्हते, तर आम्हाला तिकडे का पाठवले? 2017 ला देखील असाच प्रयत्न झाला होता. ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली होती. राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे उपस्थित होते. कोणती खाती, कोणती पालकमंत्रिपदे, मी कधीही खोटे बोलत नाही. खोटे बोललो, तर पवारांची औलाद ठरणार नाही. आम्हाला निरोप आला. सुनील तटकरे यांना दिल्लीला बोलावले. त्यांच्या वरिष्ठांनी सांगितले, आम्ही 25 वर्षं शिवसेनेसोबत होतो आणि आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. ते म्हणाले, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी असे सरकार राहील. आपल्या वरिष्ठांना ते मंजूर नव्हते. ते म्हटले, शिवसेना आम्हाला चालत नाही. शिवसेना जातीयवादी आहे. त्यावेळी ते बारगळले. परत आले. त्यानंतर 2019 आले. निकाल लागल्यानंतर परिस्थिती काय होती, हे सर्वांना माहीत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. मला उपमुख्यमंत्री केले. मी कधी हूँ की चूँ केले नाही. कोरोना काळात काम केले. त्यात हलगर्जीपणा केला नाही. त्यानंतर शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही आमच्या प्रमुखांना सांगितले, काही तरी वेगळे घडतेय. उद्धव ठाकरे यांना सांगितले, काही तरी घडतेय; पण कुणी लक्ष दिले नाही. घडायचे ते घडले. त्या आमदारांना विचारा, माझ्याच चेंबरमध्ये मिटिंग झाली. माझ्यासह 53 आमदार सगळ्यांनी सह्या करून एक पत्र तयार केले. हसन मुश्रीफ यांनी पत्र ड्राफ्ट केले. एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतला. ते गुवाहाटीला गेले. त्यावेळी आम्ही 51 आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला; पण वरिष्ठांनी निर्णय घेतला नाही. मी एकही शब्द खोटं बोलत असेल, तर पवारांची औलाद म्हणून नाव लावणार नाही.

मला आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितले, कुठे बोलू नका!

2014 साली मोदींच्या चेहर्‍यावर भाजपनं केंद्रात सत्ता आणली. त्यानंतर 2019 सालीही मोदींनी एकहाती सत्ता आणली. 2024 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीनंतर एका उद्योगपतीच्या घरी एक चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितले, कुठे बोलायचे नाही. नेत्यांनी सांगितले म्हणून मी कुठे बोललो नाही. त्यानंतर अचानक बदल झाला. आम्हाला सांगितले, आपण शिवसेनेसोबत जायचे. 2017 ला शिवसेना जातीयवादी होती, असा काय चमत्कार होता दोन वर्षांत शिवसेना मित्रपक्ष झाला. ज्या भाजपसोबत जाणार होतो तो जातीयवादी झाला. असे नाही चालत. हे सगळे होत असताना इथे एकदा वेगळी भूमिका, तिथे वेगळी भूमिका कशी घेता येईल?

जीवात जीव असेपर्यंत कार्यकर्त्याला अंतर देणार नाही

आम्हीही पक्ष बांधला… आम्हालाही लोकं ऐकतात… आम्हीही नेते आहोत… जर आंबेगावात पवारसाहेबांनी सभा घेतली, तर मलाही प्रत्युत्तर म्हणून सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल… एका आमदाराने म्हटलं, मला आमदार व्हायचंय… तर ते म्हणाले की, पाहतोच तू जिंकून कसा येतो… असं आपल्या कार्यकर्त्याला बोलतात का? परिवार आहे तो आपला! आज माझ्यावर जी वेळ आली आहे ती कुठल्याही परिवारावर येऊ नये… माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला जीवात जीव असेपर्यंत अंतर देणार नाही.

आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही माझी चूक आहे का?

मला वारंवार व्हीलन केलं जातं. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही माझी चूक आहे का? शरद पवारांच्या धोरणामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. माझी वरिष्ठांना विनंती आहे, त्यांनी आता आराम करावा, जास्त हट्टीपणा करू नये.

भुजबळ घामाघूम

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे भाषणही अत्यंत आक्रमक झाले. त्यांनी शरद पवार यांच्यावरही थेट नाव न घेता निशाणा साधला. शरद पवार जे सांगतील ते आदेश मानून ऐकले, असे सांगताना ते ऐन पावसाळ्यातही घामाघूम झाले. त्यांनी गळ्यात राष्ट्रवादीचा गमछा परिधान केला होता. मात्र, थोड्या वेळाने त्यांनी तो काढून टाकला.

पवारांनीच सांगितलं, 2024 साली मोदींशिवाय पर्याय नाही

पवारांनी स्वतः आम्हाला सांगितलं की, 2024 साली नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही… आपण विधानसभेच्या 90 जागा लढवणार… लोकसभेच्याही जास्त जागा लढवणार आहोत.

वय झालं, तुम्ही थांबणार आहात की नाही?

वय जास्त झालं. 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्ही शतायुषी व्हा. मला सांगितलं, राजीनामा देतो आणि संस्थेची कामे पाहतो. राजीनामा दिल्यावर एक कमिटी करतो. ती कमिटी केल्यावर तुम्ही बसा आणि बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. आम्ही तयार झालो. तेही आम्हाला मान्य होतं. त्यानंतर दोन दिवसांत सांगितलं, राजीनामा मागे घेतला. मागे घेतला, तर दिला कशाला?

Back to top button