Maharashtra Political Crisis : कालचे पक्के वैरी… आज सख्खे शेजारी

Maharashtra Political Crisis : कालचे पक्के वैरी… आज सख्खे शेजारी

मुंबई, राजन शेलार : एरव्ही राजकीय मैदानात, आंदोलनात किंवा विधिमंडळाच्या सभागृहात आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांवर तुटून पडणारे कालचे वैरी आज एकमेकांचे सख्खे शेजारी असल्याचे दिसून आले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नव्याने सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन मंत्री शपथ सोहोळ्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना आणि भाजप मंत्र्यांंच्या मांडीला मांडी लावून बसले होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेतून बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी करीत आघाडीचे सरकार पाडले. अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस व ठाकरे गटाला विरोधी पक्षात बसावे लागले. सुरत, गुवाहाटी, गोवा… अशा राज्यांच्या प्रवासानंतर शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेचा घट बसवला.

त्यामुळे संतापलेल्या आघाडीतील नेत्यांनी सार्वजनिक ठिकाणी असो किंवा विधिमंडळाचे आवार असो… शिंदे गटाला गद्दार, 50 खोके, एकदम ओके… असे म्हणत डिवचायला सुरुवात केली. यामध्ये ठाकरे गटाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नेते मंडळीही आघाडीवर होते. विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तुटून पडत होते. अनेक मुद्द्यांवर सरकारलाही धारेवर धरत त्यांनी जाब विचारला होते. यावेळी सत्ताधारी व विरोधी बाकावरून आरोप-प्रत्यारोपही केला जात होता; पण आज परिस्थिती नेमकी उलटी झाली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्षही पूर्ण होत नाही तोच राजकीय सारीपाटाचा डाव उलटला अन् भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवणी करत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उरकला. त्यांच्यासोबत इतर आठ मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेत सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले.

logo
Pudhari News
pudhari.news