Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण

महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश आल्यानंतरच्या राजकीय पटलावर पक्ष फोडीचा पहिला उद्योग केला, तो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी. ते साल होते 1978. महिना जुलै. तेव्हा ज्येष्ठ नेते वसंतरावदादा पाटील मुख्यमंत्री होते. आपण काही वेगळा विचार करीत नाही, असे दादांना समक्ष भेटीत शरद पवार यांनी सांगितले होते. ते शब्द हवेत विरण्याआधीच त्यांनी सत्तारूढ काँग्रेस पक्षात फूट पाडली. वेगळी चूल मांडली. पुरोगामी, डाव्या विचारसरणीचा वारसा सांगणार्‍या पवारांनी तेव्हा जनसंघासह इतर पक्षांची मोट बांधून पुलोदचा प्रयोग केला. आता त्यांचे पुतणे अजित पवार यांनी 45 वर्षांनी जुलै महिन्यातच काकांच्या प्रयोगाची पुनरावृत्ती केली आहे. पूर्वाश्रमीच्या जनसंघाशी व विद्यमान भाजपशी त्यांनी हातमिळवणी केली आहे. (Maharashtra NCP Crisis)

वास्तविक गेल्या दोन-अडीच महिन्यापासून अजित पवारांच्या गुप्त हालचाली सुरू होत्या. गेल्याच आठवड्यात त्यांनी नवी दिल्लीला दोन वेळा भेटी दिल्या त्याचाही कोणाला थांगपत्ता लागलेला नव्हता. महिन्याभरापूर्वी काका-पुतण्यांनी हिंडेनबर्ग प्रकरणात संशयाची सुई रोखले गेलेले उद्योगपती गौतम अदानी यांची शरद पवार यांनी भलावण केली होती आणि अजित पवार यांनीही त्यांची री ओढली होती. पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्यावरही अजित पवार यांनी स्तुतिसुमने उधळली होती. ज्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्या आघाडीची मते वेगळी असताना काका-पुतण्यांनी सुरात सूर मिसळून अशी वक्तव्ये करावीत, हे राजकीय विश्लेषकांना विचार करायला लावणारे होते.

शरद पवार हे अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष राजकारणी म्हणून माहीर आहेत. राजकीय द्रष्टेपणात ते महशूर असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-अडीच महिन्यापासून अजित पवार यांच्या चाललेल्या हालचाली त्यांच्या नजरेतून सुटल्या असतील, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल.

आता रविवारी झालेली 'देवगिरी'वरची बैठक! शुक्रवार/शनिवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना तातडीचे निरोप गेले होते. रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून 'देवगिरी'वर आमदारांची वर्दळ सुरू झाली होती. साडेनऊपर्यंत बहुतांश आमदार आले. महत्त्वाचे म्हणजे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हटले जाणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदी ठळकपणे दिसत होते. एवढेच काय, खुद्द पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे याही हजेरी लावून गेल्या. एवढी सारी साग्रसंगीत मोहीम, तीही पवारांच्या निकटवर्तीयांच्या साक्षीने चाललेली असताना, त्यामागे पवार यांचा हात नसावा, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा पक्षाचे नवनियुक्त कार्याध्यक्ष आणि पवारांचे अत्यंत जवळचे प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. 'आम्हाला सार्‍यांचे आशीर्वाद आहेत,' हे अजित पवारांचे उद्गार पुरेसे बोलके आहेत. या सार्‍या प्रकरणामागे बोलविते धनी कोण असावेत, हे त्यांच्या उद्गारावरून स्पष्टच होते. (Maharashtra Political Crisis)

राजकारणात अनेक नेते दोन डगरीवर हात ठेवून वावरतात. काही वेळा तसे वर्तन अपरिहार्य असते. पण पवारांची राजकीय वाटचाल दोन नव्हे तर अनेक डगरीवर हात ठेवलेली दिसून येते. हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना 'तेल लावलेला पैलवान' म्हणत, ते यथार्थच होते. 1978 ची फूट असो, त्यानंतर विरोधी पक्षांशी हातमिळवणी, 1986 मध्ये पुन्हा काँग्रेस प्रवेश, 1999 मध्ये परत काँग्रेस पक्ष सोडून नवी चूल मांडण्याचा उद्योग, त्यानंतर सत्तेसाठी 1999, 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसशी समझोता, 2014 च्या निवडणूक निकालानंतर भाजपला एकतर्फी पाठिंबा देण्याची घोषणा, 2019 च्या नोव्हेंबरात पहाटेच्या शपथविधीवेळचा तथाकथित डबलगेम आणि त्याचा खराखुरा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्यावरची त्यांची मखलाशी, एवढ्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत अनेक मातब्बरांच्या पाठीमागे पाडापाडीसाठी केलेले प्रयत्न, अशा अनेक घडामोडीतून शरद पवार यांचे राजकारण कसे भूलभुलय्यासारखे आहे, याची कल्पना येते. शरद पवार यांचे खंबीर प्रशासन, त्यांची निर्णय क्षमता, कठोर परिश्रम याबाबत दुमत होणार नाही. तथापि, त्यांची राजकारणातील 'बिकट वाट वहिवाट' मात्र अनाकलनीय आहे. ते केव्हा कोणता निर्णय घेतील, हे कोणालाही सांगता येणार नाही, असे त्यांच्याविषयी म्हटले जाते आणि त्यात पूर्ण तथ्य आहे.

महाविकास आघाडीला धक्का (Maharashtra NCP Crisis)

शरद पवार यांच्या राजकारणाची वाटचाल पाहता, सध्याच्या घडामोडीमागे पवार यांचा आशीर्वाद असावा, अशीच शंका बळकट होते. राज्याच्या राजकारणातील या नव्या वळणाने महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या लोकसभा/विधानसभा निवडणुकांत भाजपला अजित पवार नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षामुळे चांगली मदत होईल, अशीच चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेची तलवार टांगती असताना भाजपने संभाव्य डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तातडीने व्यूहरचना केली. त्यात पवार यांच्या सुप्त आशीर्वादाने अजित पवार यांची साथ मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच अशी फोडाफोडी आणि फाटाफूट होऊन राजकीय वातावरण कमालीचे अस्थिर बनले आहे. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असा हा खेळ असल्याचीच चर्चा आहे. काका-पुतण्यांच्या या सिद्धसाधक खेळीचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रामुख्याने पक्षीय संघटना खिळखिळ्या होण्याची आणि राजकारणात अपप्रवृत्ती डोके वर काढण्याची भीती नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news