‘एनआयए’चे मुंबई, पुण्यात छापे; ‘इसिस’च्या चौघांना अटक | पुढारी

‘एनआयए’चे मुंबई, पुण्यात छापे; ‘इसिस’च्या चौघांना अटक

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या चौघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी अटक केली. ‘एनआयए’च्या पथकांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी करून ही कारवाई केली आहे. ‘एनआयए’ने आरोपींच्या घरांतून महत्त्वपूर्ण दस्तऐवज, आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

मुंबईच्या नागपाडा परिसरातील एक तरुण ‘इसिस’शी संबंधित असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘एनआयए’ने 28 जूनला गुन्हा दाखल करून या संशयिताच्या हालचालींवर नजर ठेवली. त्यानंतर ‘एनआयए’ने सोमवारी नागपाडा येथे छापेमारी करून ताबीज नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. ताबीज हा ‘इसिस’मधील आमीर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. ताबीजने ‘व्हाईस ऑफ हिंद’ या ‘इसिस’च्या मासिकात लेखसुद्धा लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, ताबीज हा राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या नागपाडा येथील मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर वास्तव्यास होता.

‘एनआयए’ने मुंबई आणि ठाण्यातील पडघा येथील प्रत्येकी दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करत एकूण चारजणांना अटक केली आहे. हे चारही संशयित आणि ताबीज असे एकूण पाचजण ‘इसिस’च्या संपर्कात होते. या पाचही जणांची ‘एनआयए’कडून कसून चौकशी सुरू आहे. ‘एनआयए’ने पुण्यातील कोंढवा येथून वजीर कस्केड सोसायटीमध्ये राहणार्‍या जुबेर शेख (वय 39) याला अटक केली आहे. जुबेर हा ‘इसिस’च्या शिमोगा कर्नाटक मोड्यूलसोबत काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Back to top button