जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाच अपात्र करा; विधानसभा अध्यक्षांना दिले पत्र : अजित पवार | पुढारी

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाच अपात्र करा; विधानसभा अध्यक्षांना दिले पत्र : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आल्याचे ट्विट शरद पवार यांनी करताच काही वेळात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट शरद पवार यांच्यावरच कुरघोडी केली. यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे हेही उपस्थित होते.

यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांची विधिमंडळ नेता, प्रदेशाध्यक्ष पदी सुनिल तटकरे आणि प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती करत अल्याचे जाहीर केले. तर अजित पवार विधिमंडळ पक्षाचे नेते असतील अशीही त्यांनी घोषणा केली.

पटेल म्हणाले की, नव्या नियुक्त्यांबाबत विधानसभा अध्यक्षांना रविवारीच कळविले आहे. अनिल पाटील यांना महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या प्रतोदपदी नेमले आहे. ही प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. पुढे जी संघटनात्मक कारवाई करायची असेल ती केली जाईल. पक्षाच्या मागच्या दिल्लीच्या 21 जूनच्या कार्यक्रमात मला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. मात्र सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं होतं त्यानंतर पक्षाच्या वर्किंगमध्ये उपाध्यक्ष नियुक्त झालो होतो. तेव्हा मी काही नियुक्त्या जाहीर केल्या होत्या, यात जयंत पाटील यांची हंगामी नियुक्ती केली होती. तात्काळ व्यवस्था असावी त्यासाठी त्यांना जबाबदारी दिली होती, त्यापार्श्वभूमीवर आम्ही जयंत पाटील यांना कळवलं आहे, त्यांना मुक्त करतोय. सुनिल तटकरे यांना नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करतो, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.

आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करा : अजित पवार

राज्यातील नवीन महायुतीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालवून दाखवतो. कुणाला हे बंड वाटते आहे. पण कायद्यानुसार गोष्टी वेगळ्या असतात. रात्री 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन काहीही निर्णय घेतले जातात. त्यांना काही अर्थ नाही. पक्षाचे बहुसंख्य आमदार कुणाकडे आहेत, नेते कुणाकडे आहेत, बहुमत कुणाकडे आहे याचा विचार केला पाहिजे. जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्यासंदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर बंडखोर राष्ट्रवादी आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेतला. रात्री उशिरा आव्हाडांनी अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले होते, त्याच संदर्भाने अजित पवारांनी आव्हाड आणि जयंत पाटील यांना टोला लगावला आहे.

Back to top button