Jayant Patil : अजित पवारांसह ९ जणांचेच पक्षांतर, बाकी सर्व आमदार आमच्यासोबत : जयंत पाटील | पुढारी

Jayant Patil : अजित पवारांसह ९ जणांचेच पक्षांतर, बाकी सर्व आमदार आमच्यासोबत : जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : “विधानसभेत आमच्या पक्षाचे संख्याबळ ५३ आहे, त्यापैकी केवळ ९ आमदारांनी पक्षांतर केले आहे, बाकी सर्व आमदार आमच्यासोबत आहेत,” असा दावा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (दि.३) माध्यमांशी बोलताना केला.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, “आम्ही काल रात्री विधानसभा अध्यक्षांकडे याचिका पाठवली आहे. आम्ही त्यांना आमचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती केली आहे. विधानसभेत आमच्या पक्षाचे संख्याबळ ५३ आहे, त्यापैकी ९ आमदारांनी पक्षांतर केले आहे, बाकीचे सर्व आमच्यासोबत आहेत. त्यांना परत येण्याची योग्य संधी देऊ पण जे परत येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.

याचिकेचा अभ्यास करून योग्य निर्णय घेईन : नार्वेकर

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ आमदारांविरूद्ध अपात्रतेची याचिका सादर केली असून ती मला प्राप्त झाली आहे. याचिका वाचून व त्यामध्ये नमुद केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेईन, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (दि. ३) माध्यमांशी बोलताना सांगितले.

“विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे. हा अधिकार बजावत असताना विधानसभा अध्यक्षांना संविधानीक तरतुदी आणि विधानसभेच्या नियमांचे पालन करूनच निर्णय घेतला जाईल. जयंत पाटील यांनी ९ आमदारांविरूद्ध अपात्रतेची याचिका सादर केली आहे. ती मला प्राप्त झाली आहे. ती वाचून योग्य निर्णय घेईन, याचिकेचे वाचन केल्याशिवाय अपात्रतेबाबत काही सांगू शकत नाही,” असेही नार्वेकर यांनी सांगितले.

अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा शब्द : पृथ्वीराज चव्हाण

“अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द भाजपकडून देण्यात आला आहे, अशी आम्हाला माहिती मिळतेय. एकनाथ शिंदे यांना बाजूला करून किंवा विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रतेचा निर्णय घेवून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला आहे,” असे विधान काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना केले आहे.

Back to top button