maharashtra news ajit pawar : 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच बदलणार'; संजय राऊत यांचा दावा | पुढारी

maharashtra news ajit pawar : 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच बदलणार'; संजय राऊत यांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच बदलणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काही दिवसच मुख्यमंत्री असतील. अजित पवार आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदाचं डील झालं आहे, असा दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे माध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार हे निश्चित आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी लागेल. यासाठी भाजपने पुढील व्यवस्था केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार असून अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देवून ही जागा भरून काढण्याचे काम काल झालं आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

राऊत पुढे म्हणाले की, बुलढाण्यात चिता जळत असताना शपथविधी पार पडला. २४ तास दुर्घटनेला झाले नसताना राजभवनात पेढे वाटप आणि फटाके वाजवले जात होते. या महाराष्ट्राने इतक्या निर्घुण पद्धतीचे राजकारण कधीच पाहिले नाही. काल महाराष्ट्राने जे पाहिलं ते राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणार आहे. कालपर्यंत शरद पवार काही लोकांचे गुरू होते मात्र त्यांनीच पवारांशी बेईमानी केली. महाराष्ट्रात हा काय प्रकार सुरू झालाय आणि याचे प्रणेते कोण आहेत? भाजपकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर हल्ला सुरू आहे. त्याची किंमत या सर्वांना चुकवावी लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि समाजकारणातून शरद पवारांच नेतृत्व संपवण्याच काम सुरू आहे. महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिण्यासाठी खेळ सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार हे लोकनेते आहेत. त्यामुळे अशा घटनांमुळे काही फरक पडत नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Back to top button