राष्ट्रवादीला आणखी पाच खाती; प्रत्येकी 14 मंत्र्यांचा फॉर्म्युला | पुढारी

राष्ट्रवादीला आणखी पाच खाती; प्रत्येकी 14 मंत्र्यांचा फॉर्म्युला

मुंबई; दिलीप सपाटे :  शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या शिवसेना-भाजपमधील इच्छुक आमदारांच्या पदरी निराशा आली आहे. प्रत्येकी 14 मंत्री असा फॉर्म्युला ठरल्याचे कळते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी पाच मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. असे झाल्यास शिवसेना-भाजपच्या प्रत्येकी चार जणांनाच संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

राज्य मंत्रिमंडळात 42 जागा आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 10 मंत्री आहेत. आता अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या 9 जणांचा समावेश झाल्याने मंत्रिमंडळातील 29 जागा भरल्या गेल्या आहेत. अजून 13 जागा रिक्त आहेत.
राष्ट्रवादीसोबतच्या वाटाघाटीनुसार राष्ट्रवादीलाही सत्तेत समान वाटा दिला जाणार आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीला प्रत्येकी 14 मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यानुसार राष्ट्रवादीच्या आणखी पाच जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. तर उर्वरित आठ जागांपैकी 4 मंत्रिपदे भाजपला, तर 4 मंत्रिपदे शिवसेला मिळणार आहेत.

मंत्रिपदाचे दावेदार वेटिंगवरच

भाजप आणि शिंदे गटामध्ये मंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. गेली वर्षभर ते मंत्रिमंडळात वर्णी लागेल म्हणून डोळे लावून बसलेले आहेत. शिंदे गटातील भरत गोगावले, बच्चू कडू, संजय शिरसाट यांनी तर जाहीरपणे मंत्रिपदाची मागणी केली आहे. याशिवाय डझनभर आमदार मंत्रिपदावर दबक्या आवाजात दावा सांगत आहेत. तीच स्थिती भाजपमध्ये आहे; पण आता प्रत्येकी चार जणांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असल्याने कोणाचे नशीब उघडणार याची उत्सुकता आहे.

Back to top button