Sanjay Raut: महाराष्ट्रातील २ केंद्रीय मंत्र्यांना डच्चू, तर शिंदे गटातील ४ मंत्री…; संजय राऊतांचा मोठा दावा | पुढारी

Sanjay Raut: महाराष्ट्रातील २ केंद्रीय मंत्र्यांना डच्चू, तर शिंदे गटातील ४ मंत्री...; संजय राऊतांचा मोठा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्र आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर आता ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. तर, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास शिंदे गटातील ४ मंत्री घरी जातील, असा दावा राऊत (Sanjay Raut)  यांनी केला आहे.

राऊत (Sanjay Raut)  म्हणाले की, महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आम्ही राज्यातील सरकारकडे सरकार म्हणून बघत नाही. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याला आणि विश्वासघाताला एक वर्ष पूर्ण झाले आहे, अशी टीका राऊत यांनी शिंदे गटावर केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच वेळेस गुगली आणि षटकार ठोकले. या गुगलीवर देवेंद्र फडणवीस आणि भाजप क्लिनबोल्ड झाला, असा टोला लगावून शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांना १०० जन्म घ्यावे लागतील. पवारांनी गुगली टाकली नसती, तर एखादे वेगळे खोके सरकार येईपर्यंत राष्ट्रपती राजवट कायम राहिली असती, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि.२९) रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रात्री उशिरा पर्यंत चालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकी दरम्यान कुणाला मंत्रीपद द्यायचे याचा निर्णय सर्वस्वी शिंदेंवर सोडण्यात आल्याचे कळते. शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची ही चर्चा आहे.

हेही वाचा 

Back to top button