मुंबई पालिका १५,५०० रुपयांचा बोनस देणार? | पुढारी

मुंबई पालिका १५,५०० रुपयांचा बोनस देणार?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे सांगत यंदा मुंबई पालिका कर्मचार्‍यांना गतवर्षीइतकाच म्हणजे 15 हजार 500 रुपये बोनस (सानुग्रह अनुदान ) देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. पालिकेच्या खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनाही 7 हजार 750 रुपये बोनस देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव लेखापाल विभागाने पालिका आयुक्तांना सादर केला आहे. एक-दोन दिवसात बोनसची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पालिका कर्मचार्‍यांना 25 ते 30 हजार रुपये बोनस देण्यात यावा अशी मागणी कामगार नेत्यांसह पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी केली असली तरी यासंदर्भात अद्यापपर्यंत कामगार संघटना गटनेते यांच्या प्रशासनासोबत बैठका झालेल्या नाहीत. तत्पूर्वीच हा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादरही झाला आहे.

2019 मध्ये मुंबई पालिका कर्मचार्‍यांना 15 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. 2020 मध्ये कोरोनाचे संकट असतानाही 500 रुपये बोनसमध्ये वाढ करण्यात आली. मात्र यावेळी कोरोना उपाययोजनांवर झालेले अडीच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यामुळे बोनस रक्कम वाढवणे शक्य नसल्याचे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

महापालिका प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, प्राथमिक अनुदानित शाळेतील शिक्षण सेवकांनाही बोनस देण्यात येणार आहे. आरोग्य सेविकानाही भाऊबीज भेट म्हणून चार हजार ते साडेचार हजार रुपये देण्यात येणार असल्याचे समजते.

मीरा-भाईंदरचा बोनस 22,470 रुपयांचा

एकीकडे श्रीमंत मुंबई महापालिकेने जेमतेम 15 हजार रुपयांचा बोनस देण्याचा प्रस्ताव तयार केला असतानाच मीरा-भाईंदर महापालिकेने मात्र आपल्या कर्मचार्‍यांना 22,470 रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. मंगळवारी महापालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Back to top button