ठाकरे गटाच्या लोकसभा जागांवर काँग्रेसचा डोळा | पुढारी

ठाकरे गटाच्या लोकसभा जागांवर काँग्रेसचा डोळा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्याची सद्याची राजकिय परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्या स्थितीनुसार महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना तडजोड करावी लागणार आहे, असे सांगतानाच जे खासदार निवडून आले आहेत आणि ते त्याच पक्षात असतील तेथे काहीच अडचण नाही. परंतु, जे खासदार अन्य पक्षात गेले आहेत तेथील राजकिय परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे सूतोवाच करत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकप्रकारे ठाकरे गटाच्या जागांवर दावा ठोकला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसच्यावतीने फक्त अशोक चव्हाण हे एकमेव नेते उपस्थित होते. तर ठाकरे गटाकडून कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे पवार व चव्हाण या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली.

ते म्हणाले, राज्यातील जी राजकीय परिस्थिती पाहता विधानसभेच्या निवडणूकीची पूर्वतयारासाठी महाविकास आघाडीची बैठक कधी घ्यायची, पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा काय असावा यावर साधकबाधक चर्चा केली. जागावाटपासंदर्भात अधिवेशनाच्या अगोदर एकत्र बसून चर्चा करू, असे सांगतानाच कोणकोणती जागा लढवणार अशी जागानिहाय चर्चा झाली नाही. परंतु, तशी चर्चा करायची असेल तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळाचे नेते आणि मी असे तिघे असू तेव्हाच याबाबत चर्चा केली जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Back to top button