drug case bail hearing : आर्यन खानची आजची रात्र तुरुंगातच, उद्या पुन्हा सुनावणी | पुढारी

drug case bail hearing : आर्यन खानची आजची रात्र तुरुंगातच, उद्या पुन्हा सुनावणी

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी आर्यन खान याच्या जामीन अर्जावर ( drug case bail hearing ) आज मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. पण आजही आर्यनला जामीन मिळाला नाही, उद्या दुपारी या प्रकणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने उद्यापर्यंत तहकूब केली आहे.

यापूर्वी २० ऑक्‍टोबर रोजी मुंबई सत्र न्‍यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. मागील १८ दिवसांपासून आर्यन खान कारागृहामध्‍ये आहे. तसेच ८ ऑक्‍टोबर रोजी त्‍याची रवानगी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात करण्‍यात आली होती. ड्रग्‍ज बाळगणे आणि त्‍यांचे सेवन केल्‍याचा आरोप
त्‍यांच्‍यावर आहे.

आर्यन खानच्‍या जामिनाला ‘एनसीबी’चा विरोध

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव टाकण्‍यात येत आहे, यामुळे याप्रकरणातील संशयित आरोपी आर्यन खान याच्‍या फेटाळावा, अशी मागणी एनसीबीने आज उच्‍च न्‍यायालयात केली.

( drug case bail hearing ) शाहरुख खानच्‍या मॅनेजरकडून साक्षीदारांवर दबाव

अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा दादलानी ही साक्षीदारावर दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न करत आहे, असेही ‘एनसीबी’च्‍या वकिलांनी सांगितले. आर्यन खान याला जामीन मंजूर झाल्‍यास या प्रकरणातील साक्षीदार व या प्रकरणाच्‍या चौकशीवर परिणाम होवू शकतो, असेही त्‍यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी सत्र न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्णयचाही उल्‍लेख करत याप्रकरणातील संशयितांनी जामीन देण्‍यासाठी योग्‍य नाही, असे एनसीबीच्‍या वकिलांनी स्‍पष्‍ट केले.

पैशाच्‍या डीलमध्‍ये कोणताही संबंध नाही : आर्यनचे प्रतिज्ञापत्र

आर्यनच्‍या वकिलांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, आर्यन खान याचा प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांच्‍याशी ओळख नाही. तसेच ड्रग्‍ज प्रकरणी कोट्यवधी रुपयांच्या देवाणघेवाणीच्या आरोपांशी आर्यन खान याचा कोणताही संबंध नाही.

न्‍यायाधीशांनी कामकाज थांबवले

आर्यन खानच्‍या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी न्‍यायालयात प्रचंड गर्दी झाली. यावर न्‍यायालयाने नाराजी व्‍यक्‍त करत सुनावणीचे कामकाज थांबवले. गर्दी कमी करुन पुन्‍हा एकदा न्‍यायालयानचे कामकाज सुरु करण्‍यात आले.

‘एनसीबी’ने केला अधिकारांचा गैरवापर : मुकुल रोहतगींचा युक्‍तीवाद

माजी ॲटर्नी जनरल आणि विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी आर्यनसाठी युक्‍तीवाद केला. ते म्‍हणाले, आर्यन खान याने क्रूझने गोव्‍याला जाण्‍यासाठी तिकिटही काढले नव्‍हते. त्‍याला क्रूझवरील पार्टीचे आमंत्रण होते. त्‍याच्‍याकडे कोणत्‍याही प्रकारचे ड्रग्‍ज सापडलेले नाही; मग त्‍याला अटक कशी केली? असा सवाल करत एनसीबीच्‍या अधिकार्‍यांनी अधिकाराचा गैरवापर करत आर्यन खान याला अटक केली, असेही त्‍यांनी सांगितले.

अरबाझ मर्चंट याच्‍याकडे काही प्रमाणात ड्रग्‍ज सापडले. आर्यन खानचा ड्रग्‍जशी कोणत्‍याही प्रकारचा संबंध नाही. त्‍याची वैद्‍यकीय चाचणी देखील घेतली गेली नाही. आर्यन खानला टार्गेट केले जातंय, असेही या वेळी रोहतगी यांनी न्‍यायालयास सांगितले. आर्यन खान याला अट्‍टल गुन्‍हेगाराप्रमाणे वागवणे चुकीचे आहे. कारवाई करणार्‍या एनसीबीच्‍या विभागीय संचालकांवरच या प्रकरणातील पंचाने गंभीर आरोप केले आहेत.आर्यन खानच्‍या मित्राच्‍या बुटात ड्रग्‍ज सापडले; मग आर्यन खानला अटक का करण्‍यात आली. त्‍यामुळे आता एनसीबीने केलेल्‍या कारवाईबाबतच प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले जात आहेत. एकुणच आर्यन खानला या प्रकरणी चुकीच्‍या पद्‍धतीने अटक करण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी न्‍यायालयास सांगितले.

Back to top button