पालिका अधिकाऱ्याला मारहाण; ठाकरे सेनेच्या अनिल परब यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

पालिका अधिकाऱ्याला मारहाण; ठाकरे सेनेच्या अनिल परब यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील वाकोला पोलिसांनी बीएमसी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यासह १५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली असल्याची माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे.

वांद्रे पूर्वेच्या अनधिकृत शाखेवर कारवाई करताना बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप करत, सोमवारी दुपारी पालिकेच्या सांताक्रुझ एच- पूर्व विभागातील सहाय्यक अभियंत्याला ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व जोरदार धक्काबुक्की केली. कार्यकर्त्यांनी दालनात घुसून सहाय्यक अभियंता अजय पाटील यांना शिव- सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा का मारला, अशी विचारणा केली. यावर पाटील यांनी अशा प्रकारे कोणतेही कृत्य करण्यात आलेले नाही, असे सांगितले.

वांद्रे पूर्वेकडील कार्यालय अनधिकृत असल्यामुळे ते तोडण्यात आले. परंतु यावर समाधानी न झालेले कार्यकर्ते पाटील यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. तरीही कार्यकर्त्यांनी पाटील यांना मारहाण करत जोरदार धक्काबुक्की केली. पालिका कार्यालयात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असल्यामुळे पाटील यांना आपला बचाव करता आला नाही. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

शिवसेनाप्रमुख हे आमचे दैवत आहे. त्यांचा केलेला अपमान आम्ही खपवून घेणार नाही. शाखेत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो व छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती होती. ती शाखेवर कारवाई करण्यापूर्वी बाहेर काढण्याची विनंती शिवसैनिकांनी केली. पण सहाय्यक अभियंता पाटील ऐकण्याच्या मनः स्थितीत नव्हते. त्यामुळे मंगळवारी मोर्चाच्या वेळी शिवसैनिक चिडल्याचे ठाकरे सेनेकडून सांगण्यात आले.

 

Back to top button