दलित, मुस्लिम, शेतकरी मतांवर ‘केसीआर’ यांचा डोळा

चंद्रशेखर राव
चंद्रशेखर राव

मुंबई : नरेश कदम : भारत राष्ट्र समिती आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपले पक्षाचे बस्तान बसविण्याचे ठरविले असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा वंचित, एमआयएम यांच्यासह काही छोट्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी करणार आहेत. यात दलित, मुस्लिम आणि शेतकरी यांच्या मतांवर केसीआर यांचा डोळा आहे.

केसीआर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या पक्षाची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. केसीआर यांनी गेल्या काही महिन्यात नांदेड, छत्रपती संभाजी नगर अशा मराठवाड्यातील महत्त्वाच्या शहरात दौरे केले आहेत. तेलंगणा हे राज्य मराठवाड्याला लागून आहे. केसीआर हे देशात शेतकऱ्यांचे सरकार आले पाहिजे, अशी भूमिका मांडत आहेत. मुंबईसह राज्यभरात अब की बार किसान सरकार अशा जाहिराती त्यांच्या पक्षाच्या झळकत आहेत. जसे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी गुजरात मॉडेलचा प्रचार केला. तसा केसीआर हे तेलंगणा मॉडेलचा प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांना सावध केले आहे. शिवसेना भाजपची सरळ लढत झाली तर आघाडीचा फायदा आहे. पण केसीआर वंचित आदी पक्षांनी तिसरा मजबत पर्याय दिला तर आघाडीच्या उमेदवारांना निवडणुकीत फटका बसेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे २७ जूनला सोलापूर आणि पंढरपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. तेव्हा भगीरथ भालके हे प्रवेश करणार आहेत. मराठवाड्यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या पक्षात प्रवेश केला आहे. केसीआर हे राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आणि एमआयएमसोबत आघाडी करण्यात यशस्वी झाले तर ही आघाडी, महाविकास आघाडीच्या दलित, मुस्लिम आणि शेतकऱ्यांच्या मतांवर काही प्रमाणात डल्ला मारतील, अशी भीती आघाडीच्या नेत्यांना आहे. या मतविभागणीचा फायदा भाजप, शिवसेनेला होऊ शकतो.

• भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रात पहिला सरपंच निवडून आला आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघात सावखेडा गावात पहिला सरपंच निवडून आला आहे. पंकजा मुंडे यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर केसी आर यांनी दिली असल्याचे कळते.

• काही महिन्यांपूर्वी केसीआर यांनी प्रकाश आंबेडकर यांचा हैदराबाद येथे सत्कार केला होता, तर हैदराबाद महापालिकेत भारत राष्ट्र समिती आणि एमआयएम यांच्या आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे वंचित आणि एमआयएम या दोन्ही पक्षांसोबत भारत राष्ट्र समितीची आघाडी होणार आहे. अलीकडे प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक झाले होते. यावरून राज्यात वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे केसीआर, एमआयएम आणि वंचित यांची दिशा स्पष्ट होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news