डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील निवासस्थानावर परदेशी संस्थांचा डोळा | पुढारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील निवासस्थानावर परदेशी संस्थांचा डोळा

मुंबई : राजन शेलार : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लंडनमधील निवासस्थानावर स्वतःला आंबेडकरवादी म्हणविणार्‍या काही परदेशी संस्थांकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी भीती भारताच्या परराष्ट्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या वास्तूवर अन्य कोणाचे नियंत्रण येण्याऐवजी केंद्र सरकारच्या माध्यमातून व्यापक विकासासाठी या वास्तूला स्वायत्त दर्जा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तातडीने संमती द्यावी, अशी मागणी करत परराष्ट्र विभागाने महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात शिक्षण घेत असताना लंडन शहरात वास्तव्यास होते. आता ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने विकत घेतली आहे. शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मात्र, तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्याबाबत आक्षेप घेतला होता. परंतु भारतीय उच्चायुक्तांच्या हस्तक्षेपानंतर 1 डिसेंबर 2022 रोजी स्थानिक परिषदेकडून कायदेशीर दर्जा प्राप्त झाला आहे. अलीकडेच हे स्मारक आणि संग्रहालयावर स्वतःला आंबेडकरवादी म्हणविणार्‍या काही परदेशी शिक्षण संस्थांकडून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न होत आहे, असे परराष्ट्र विभागाचे सहसचिव संदीप चतुर्वेदी यांनी सामाजिक न्याय विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

निवासस्थानाला स्वायत्त दर्जा मिळाल्यास लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, उपक्रम तसेच संग्रहालयाच्या कार्यामध्ये सुसूत्रता येईल. शिवाय डॉ. बाबासाहेबांनी राष्ट्र निर्मितीसाठी केलेले कार्य, त्यांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांनी केलेला संघर्ष आदी बाबासाहेबांच्या जीवनातील व्यापक गोष्टी यांचा संग्रहालयात समावेश करता येईल, असे सांगतानाच लंडनमध्ये उच्च शिक्षणासाठी येणारे भारतीय विद्यार्थी, विशेषत: सामाजिक न्याय विभागाकडून मिळणार्‍या शिष्यवृत्तीच्या आधारे शिकण्यासाठी येणार्‍या तरुणांना या कार्यात सहभागी करून घेण्याचा आमचा प्रस्ताव असल्याचे चतुर्वेदी यांनी पत्रात नमूद केले आहे.

Back to top button