म्हाडा कोकण मंडळाच्या विरार येथील घरांचे नष्टचर्य संपणार

म्हाडा कोकण मंडळाच्या विरार येथील घरांचे नष्टचर्य संपणार
Published on
Updated on

मुंबई :  म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रामुख्याने विरार भागात बांधलेल्या इमारतींचे नष्टचर्य येत्या काही दिवसांत संपणार आहे. सूर्या प्रकल्पाच्या माध्यमातून  या इमारतींना पाणी  पुरवठा होणार आहे. पाणी पुरवठा नसल्याने या भागातील घरांकडे अर्जदार पाठ फिरवत होते. परिणामी प्रत्येक सोडतीत अनेक घरे पडून रहात होती. पुढील सोडतीत   मात्र या घरांना उठाव मिळेल अशी अपेक्षा आहे.

सूर्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून वसई- विरार महापालिकेला १५४ दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे.  पाणी  पुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांची जोडणी  महापालिकेने जवळपास पूर्ण केली असून फक्त १० किलोमीटर पट्ट्यातील काम शिल्लक आहे. ते कामही लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर सूर्या प्रकल्पातील पाणी काशीद  कोपर येथून  जलवाहिन्यांच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे किंवा ज्या  भागात पाणी  पोहोचत नाही, तेथे पुरवण्यात येईल. या प्रकल्पाचा लाभ म्हाडाच्या इमारतींनाही होणार आहे, अशी माहिती वसई-विरार महापलिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली.

सूर्या प्रकल्प पूर्ण नसल्याने गेली अडीच वर्षे पाणी  पुरवठा करण्यात पालिका असमर्थ ठरत होती. त्यामुळे कोकण मंडळाच्या सोडतीतील घरे  पडून रहात होती. साहजिकच या घरांसाठी  नव्याने सोडत काढण्याची वेळ मंडळावर येत आहे. त्यामुळे नव्या घरांपेक्षा जुन्याच घरांचा सोडतीत भरणा करावा लागत आहे. अर्जदार पाठ फिरवण्यामागे  घरांचे आकारमान , घराच्या किमती ही कारणेही असली तरी पाणी   पुरवठा हा कळीचा मुद्दा बनला आहे. प्रामुख्याने विरार – बोळीज भागातील सोडतीतील घरांना हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. सोडतीतील घरांना टँकरद्वारे पणी पुरवठा केला जातो. परंतु टँकरचा कारभार बेभरोसे असल्याने ग्राहक घर घेण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. .

२०१४ सालापासून ते आजतागायत निघालेल्या सोडतीत यशस्वी होऊनही अनेक कारणास्तव  अर्जदार घरांचा ताबा घेत नाहीत, किंबहुना घरे घेण्यास नकार देतात असे चित्र आहे. कोकण मंडळाने २०१४ साली १७१६ घरांची  सोडत काढली होती, त्यापैकी ४४० घर पडून राहिली. २०१६ साली माध्यम उत्पन्न गटासाठी ३८३० घरांची सोडत काढली गेली.  त्यातील १२५८ घरे पडून राहिली. २०१८ साली काढण्यात आलेल्या ३६१८ घरांच्या सोडतीतील मात्र सगळी घरे विकली गेली. २०२१ सालीच्या सोडतीतीलही सर्व घरे विक्री झाली.  २०२३ च्या सोडतीत पुन्हा  "ये रे माझ्या मागल्या"  हा प्रकार दिसून आला. या सोडतीत अगदी प्रधानमंत्री आवास योजनेतील ६५६ घरे विक्री अभावी पडून आहेत. त्यात शिरढोण मधील २७०, गोठेघर येथील १५० आणि विरार बोलीनज येथील २३६ घरणाचा समावेश आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेतीलही १४ घरे शिल्लक आहेत.

 असा आहे सूर्या प्रकल्प

 मीरा -भाईंदर आणि वसई-विरार परिसरासाठी एमएमआरडीए  प्रतिदिन  ४०३ दशलक्ष लीटर क्षमतेचा सुर्या पाणी पुरवठा प्रकल्प राबवत आहे. २०१७ सालापासून या प्रकल्पास सुरुवात झाली. सुर्या धरणाजवळील कवडास बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी सूर्यानगर येथील जलप्रक्रिया केंद्रात शुद्ध केले जाईल. त्यानंतर ते पाणी राज्य महामार्ग, जिल्हा परिषद रोड व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ बाजूने टाकण्यात आलेल्या जलवाहिनेद्वारे   वसई -विरार महापलिकेकरिता काशीद कोपर येथील जलाशय व मीरा भाईंदर महापालिकेच्या घोडबंदर – चेन येथील जलाशयापर्यंत पाठवण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news