अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद तूर्तास शाबूत | पुढारी

अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद तूर्तास शाबूत

मुंबई : चंदन शिरवाळे : शिवसेनेच्या विधान परिषदेतील आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी जोपर्यंत ठाकरे गट सभागृहात हरकत घेत नाही, तोपर्यंत अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद शाबूत राहणार आहे.

विधानसभेत शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे गट आहेत. विधान परिषदेत मात्र अद्यापही ठाकरे यांची एकच शिवसेना आहे. कायंदे यांची शिंदे गटाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यामुळे ठाकरे गटाने त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे, पक्षातून नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या दफ्तरी कायंदे या शिवसेनेच्या आमदार म्हणूनच नोंद असेल.

शिंदे गटाच्या व्यासपीठावर कायदे गेल्या असल्या ठाकरे गटाने अद्याप कायदेशीर लेखी आक्षेप घेतलेला नाही. आक्षेप घेतल्यास किंवा कायंदे यांनी पक्षाचा व्हीप मोडल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. मात्र, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद दानवे यांच्याकडे राहण्यासाठी ठाकरे गटाकडून या दोन्ही कृती केल्या जाणार नाहीत. ठाकरे गटाने हरकत घेतल्यास शिवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ १० वरून ९ वर येईल. हा धोका टाळण्यासाठी शिवसेनेने कायदे यांची पक्षातून हकालपट्टी केलेली नाही.

शिवसेनेचे विधान परिषदेत ११ सदस्य होते. कायंदे यांनी उडी मारण्यापूर्वी विप्लव बजोरिया यांनी शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे कायंदे यांच्या कृतीवर सभागृहात आक्षेप घेतल्यास शिवसेनेची सदस्यसंख्या ९ वर येईल. सध्या राष्ट्रवादीचेही इतकेच संख्याबळ आहे. राष्ट्रवादीकडून विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाईल, अशी भीती असल्यामुळे दानवे यांच्याकडील पद शाबूत ठेवण्यासाठी कायदे यांना अभय दिले जाईल, अशी शक्यता विधिमंडळ सचिवालय कार्यालयातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली शिवसेनेचे प्रतोद कायंदे यांची राजकीय कोलांटउडी विधान परिषदेच्या सभापती अथवा उपसभापतींच्या निदर्शनास आणत नाहीत, तोपर्यंत कार्यदे यांची आमदारकी तसेच दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद शाबूत असेल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

शिवसेनेचा ठाकरे गट हा महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष आहे. कायदे यांच्यावर कारवाई केल्यास राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे सभागृहातील संख्याबळ समान येणार असले तरी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाणार नाही. या पदावरून ठाकरे गटाची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा वाटाघाटीत लोकसभा आणि विधानसभांच्या जादा जागा पदरात पाडून घेण्याची रणनीती राष्ट्रवादीकडून खेळली जाऊ शकते, असा अंदाज एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला. तसेच शिवसेनेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीला प्राधान्य दिले असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेकडून राष्ट्रवादीची एकदोन जागांवर बोळवण केली जाऊ शकते, अशी शक्यताही या नेत्याने व्यक्त केली.

Back to top button