दुचाकीची चावी काढून घेण्याचा पोलिसांना अधिकार नाही; सत्र न्यायालयाचा निकाल | पुढारी

दुचाकीची चावी काढून घेण्याचा पोलिसांना अधिकार नाही; सत्र न्यायालयाचा निकाल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांच्या दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार वाहतूक शाखेच्या पोलिसांना नाही, असा महत्त्वपूर्ण निवाडा मुंबई सत्र न्यायालयाने शनिवारी एका प्रकरणात केला. दुचाकीस्वाराला दंड वसुलीसाठी वाहतूक शाखेच्या कार्यालयात येण्याची सक्तीही करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबईतील एका तरुणाला वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल आणि शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल अटक करण्यात आली होती. हा खटला सत्र न्यायालयात चालला. संबंधित दुचाकीस्वाराची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. निकालपत्रात त्यांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. वाहतुकीचे नियम मोडणार्‍या दुचाकीस्वारांच्या दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार पोलिसांना नाही. दंड भरण्यासाठी त्यांना कार्यालयातही येण्याची सक्ती करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सागर पाठक नावाच्या या आरोपीने पोलिसांवर हल्ला केल्याचे सरकारी पक्षाने सांगितले. आरोपीने दुचाकीवरून जाताना हेल्मेट घातले नव्हते. पोलिस आल्याचे पाहून नंतर त्याने हेल्मेट घातले. त्यामुळे पोलिसांनी त्याला दंड केला. या कारवाईच्या वेळी त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. एका पोलिसावर हल्ला केला, असा आरोप सरकारी पक्षाने केला. 25 मे 2017 रोजी ही घटना घडली होती. सहा वर्षांनी सत्र न्यायालयाने निकाल दिला.

Back to top button