

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वृत्तपत्रातील जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद ताजा असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा सूर शिंदे गटातून येत आहे; मात्र तातडीने विस्तार होणार नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.
शिंदे गटाच्या 16 आमदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिलासदायक आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अद्याप विस्तारासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यात वृत्तपत्रातील जाहिरातींचा वाद उफाळून आला. त्यामुळे फडणवीस हे शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे तातडीने मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. तरी शिंदे गटाचे आमदार विस्तारासाठी उत्सुक आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेचा सोमवारी वर्धापनदिन आहे. त्याआधी विस्तार होणार अशा बातम्या त्यांच्या गोटातून येत आहेत.
शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांचा फोन चार तास नॉट रिचेबल होता. तसेच शिंदे हे शनिवारी रात्री उशिरा दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जाहिरात या विषयावर ते खुलासा करणार असल्याचे कळते. फडणवीस यांची नाराजी त्यांना परवडणारी नाही. त्यासाठी ते गेले दोन दिवस प्रयत्नशील होते. आपली प्रतिमा बनविण्याच्या नादात शिंदे अडचणीत आले. त्यामुळे तातडीने मंत्रिमंडळ विस्ताराला भाजपचे केंद्रीय नेतृत्व परवानगी देणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याशिवाय राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असे बोलले जात आहे. तरीही शिंदे यांनी दिल्लीत काही जादूची कांडी फिरवली तरच दोन दिवसांत विस्तार होऊ शकतो, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. तसेच मंत्रिमंडळ विस्तार केला तर शिंदे गटाचे आमदार नाराज होऊ शकतात, याचा शिंदे याना अंदाज आहे. त्यामुळे विस्ताराचे गाजर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत दाखवले जाऊ
शकते.