पवारांनी ठाम भूमिका न घेतल्याने पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली : प्रफुल्ल पटेल

File Photo
File Photo

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : १९९६ मध्ये केंद्रातील देवेगौडा सरकार कोसळल्यानंतर शरद पवार यांना पंतप्रधान बनण्याची संधी होती. खुद्द देवेगौडा यांनीच त्यांना पाठिंबा दिला होता. पण आमचे चुकलेच. पवार यांनी ठाम भूमिका घेतली नाही. त्यामुळे पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

काँग्रेस पक्षात शरद पवार यांना पुढे येऊ द्यायचे नाही, असा माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा प्रयत्न होता. पवार पंतप्रधान होऊ नयेत यासाठी काँग्रेसचे १४५ खासदार असतानाही नरसिंह राव यांनी देवगौडा यांना पाठिंबा दिला. नंतरच्या घडामोडीत सीताराम केसरी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आले. त्यांनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी शरद पवार हे काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते होते. पंतप्रधानपदासाठी त्यांना सर्वाधिक संधी होती. पक्षाच्या सर्वच खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. इतकेच काय, खुद्द देवेगौडा यांचीही पवार पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा होती. मात्र, पवार यांनाच या परिस्थितीत ठाम भूमिका घेता आली नाही.

रोज कसली पत्रकार परिषद : राऊतांना टोला

पटेल यांनी यावेळी रोज पत्रकार परिषद घेणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, रोज कसली पत्रकार परिषद, काही महत्त्वाचा विषय असेल तर पत्रकार परिषद घेऊन त्याची माहिती देणे इथपर्यंत ठीक आहे. माध्यमांनीही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

पृथ्वीराज चव्हाणांमुळे आघाडीत तणाव

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडीत तणाव निर्माण झाला होता. त्यांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल गैरसमज निर्माण करणाऱ्या अनेक बातम्या बाहेर येत होत्या. त्यामुळे आघाडीत तणाव निर्माण झाला होता. केवळ याच कारणामुळे २०१४ ची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढलो. एकत्रित लढलो असतो तर राज्यातील सत्ता टिकवून ठेवता आली असती, असे मत पटेल यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news