आमदार, खासदारांचे सभागृहातील वर्तन चिंताजनक; अध्यक्ष ओम बिर्ला यांची खंत | पुढारी

आमदार, खासदारांचे सभागृहातील वर्तन चिंताजनक; अध्यक्ष ओम बिर्ला यांची खंत

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीचे पवित्र मंदिर मानले जाणार्‍या संसद आणि विधिमंडळांतील कामकाज आणि आमदार-खासदारांचे तेथील वर्तन चिंतेचा विषय बनला आहे. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने संसदेचे कामकाज रोखले जाते, अध्यक्षांच्या आसनासमोर केली जाणारी घोषणाबाजी, कागदपत्रे फाडण्याचे प्रकार अशोभनीय असल्याची खंत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी मुंबईत व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी पिठासीन अधिकार्‍यांनीही निष्पक्ष आणि न्याय्य भूमिका बजाविणे गरचेचे असल्याचेही मत त्यांनी स्पष्टपणे मांडले.

देशभरातील आमदारांचे पहिलेवाहिले राष्ट्रीय संमेलन मुंबईत सुरू झाले आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लोकसभेचे माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, शिवराज पाटील, मीरा कुमार हे उपस्थित होते. या संमेलनाला देशभरातील 1500 हून अधिक आमदारांसह विविध , विधानसभांचे अध्यक्ष, विधानपरिषदांचे सभापतींनी उपस्थिती लावली आहे.

ओम बिर्ला म्हणाले की, निवडून आलेले आमदार आणि खासदार जेंव्हा संसदेत, विधानभवनात येतात तेंव्हा ते कोणत्या पक्षाचे राहत नाहीत. ते लोकप्रतिनिधी असतात.संसद आणि विधान भवनात आपण लोकांच्या कल्याणासाठी आलो आहोत, हे लक्षात ठेवायला हवे. आपण भावी पिढीला काय देतोय, हे लक्षात घ्यायला हवे. घटनकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, संविधान किती चांगले आहे ते त्याचे पालन करणार्‍या व्यक्तींवर अवलंबून आहे.

संसद, विधानभवन कितीही चांगले असली तरी शेवटी तिथे बसणार्‍या आमदार-खासदारांवरच वास्तुचे मोठेपण ठरणार आहे. संसद, विधानभवनात कायदे बनविताना, धोरणे आखताना चर्चा न करणे ही कुप्रथाच आहे. येत्या काळात आपापल्या मतदारसंघातील वंचितांचे जीवन बदलण्याचे जबाबदारी आपली असून त्यांच्यासाठी काम करण्याचे आवाहनही बिर्ला यांनी केले. मुंबईत असे संमेलन आयोजित केल्याबदद्दल एमआयटीचे विश्वनाथ कराड आणि राहुल कराड यांचे त्यांनी कौतुकही केले.

यावेळी माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, शिवराज पाटील यांचीही भाषणे झाली. त्यांनी राजकीय स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. नेता म्हणजे समाजाचे नेतृत्व करणारी व्यक्ती. पण हल्ली नेता हा शब्दच खराब झाला आहे. ही प्रतिमा सुधारण्याची गरज सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सध्याच्या काळात माध्यमे अजेंडा ठरवतात आणि त्या अजेंड्यावर लोकप्रतिनिधी काम करतो अशी खंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. वास्तविक लोकांनी आपल्याला कायदा तयार करण्यासाठी, विकासाचा भागीदार होण्यासाठी मतदारांनी निवडून दिले आहे याची जाणीव ठेवायला हवी. विधानसभेत जास्तीत जास्त चर्चा आणि चर्चेअंती विधेयके मंजूर झाली पाहिजेत, अशी भूमिका फडणवीस यांनी यावेळी मांडली.

Back to top button