शिवसेनेच्या जाहिरातीवरून युतीत वादंग

शिवसेनेच्या जाहिरातीवरून युतीत वादंग
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' या भाजपच्या घोषणेला छेद देत शिवसेनेने एका सर्र्वेेक्षणाच्या आधारे केलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी 'राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे' अशी नवी हाक दिली आहे. शिवसेनेच्या या जाहिरातीने राज्य भाजपमध्ये तीव्र पडसाद उमटले असून नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शिंदे यांच्या सोबतचा कोल्हापूर दौरा मंगळवारी रद्द केला.

राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण, यासंदर्भात एक सर्वेक्षण झाल्याचे नमूद करून त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून काही वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीतून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी राज्यातील जनतेने सर्वाधिक पसंती दिल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के पसंतीचा दावा शिवसेनेच्या या जाहिरातीतून करण्यात आला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याचा संदेश देताना 'राष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात करून राज्याचे नेतृत्व आता फडणवीस यांच्याकडे नाही तर शिंदे यांच्याकडे असल्याचा थेट संदेशही या जाहिरातीतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य भाजपमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले.

जाहिरातीतून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वगळला

गेल्या वर्षी जून महिन्यातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीचे सरकार अस्तित्वात आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर युतीची किंवा राज्य सरकारची जाहिरात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि फडणवीस या दोघांचे फोटो असायचे. मात्र शिवसेनेने केलेल्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला स्थान देण्यात आले नाही, तसेच मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे अव्वल असल्याचे म्हटल्याने नवे वादंग निर्माण झाले आहे.

लहान-मोठे असे युतीत काही नाही : चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयमी भूमिका घेत कोण मोठे आणि कोण लहान असा मुद्दा शिवसेना-भाजप युतीत नाही. राज्यातील जनतेने दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली होती. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी आहेत. त्यामुळे आता जनतेने त्यांना पसंती दिली असेल, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. एकनाथ शिंदे राज्याचे तर नरेंद्र मोदी हे देशाचे प्रमुख आहेत. त्या आशयाने जाहिरातीत राज्यात शिंदे असे लिहिले असावे, असेही ते म्हणाले.

गैरसमज एकत्र बसून दूर करू : केसरकर

जाहिरातीत चूक होऊ शकते. एखाद्या जाहिरातीमुळे कदाचित गैरसमज पसरले असतील तर आम्ही एकत्र बसून ते दूर करू. ज्यांना आमच्यामध्ये भांडण लावायचे आहेत, त्यांना लावू द्या. शिंदे आणि फडणवीस हातात हात घालून काम करत आहेत. आताही आम्ही दोन-अडीच तास एकत्र होतो, असे केसरकर म्हणाले.

सर्व्हेचा कौल असेल तर निवडणूका घेऊनच दाखवा – अजित पवार यांचे आव्हान

एका सर्व्हेचा हवाला देत जनतेचा पाठिंबा असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुका घेऊनच दाखवावे, असे आव्हान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जाहिरातबाजी करून शिंदे यांनी स्वतःचेच हसे करून घेतले आहे. सत्तेवर आल्यापासून राज्यातील रोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची सरकारने जाहिरातबाजी करावी. आजच्या जाहिरातीत दिवंगत बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची छायाचित्रे नाहीत. यावरूनच शिंदे यांच्या शिवसेनेची निष्ठा समजते.

बाळासाहेबांना विसरलात का? : संजय राऊत

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला भाजपपेक्षा जास्त मान्यता मिळाल्याच्या आनंदात तुम्ही जाहिराती दिल्या. परंतु या आनंदाच्या क्षणी तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला, असे ट्विट करीत खा. संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

नाराज फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देवेंद्र फडणवीस यांनी या जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठरलेला दौरा अचानक रद्द केला. ते मुंबईतच थांबल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा अधिकच पसरली. मात्र, देवेंद्र फडणवीस हे अजिबात नाराज नाहीत. ते कोल्हापूरला जाणार होते. पण, त्यांच्या कानाच्या दुखण्यामुळे त्यांना किमान तीन दिवस विमान प्रवास टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे त्यांनी दौरा रद्द केला, अशी माहिती शिवसेना नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्यात आले. ही सल अजूनही फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news