

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेऊन मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यात पक्ष संघटना बळकट करून जास्तीत जास्त जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मोठ्या विजयाने महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना अधिकचे बळ मिळाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.
काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, मोदी सरकारने गेल्या 9 वर्षांत लोकशाहीचा गळा घोटला आहे. शेतकरी आंदोलनावेळी सरकारविरोधातील ट्विट डिलिट करण्यासाठी ट्विटरवर दबाव आणला होता हे उघड झाले आहे. मोदी सरकारच्या राज्यात माध्यम स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही घाला घातला होता. या सरकारचा पराभव करणे हे आता काँग्रेसचे ध्येय आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रातून शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहे. वर्षांनुवर्षे शांततेने पार पडत असलेल्या वारीमध्ये गोंधळ घालून वारी परंपरा संपवण्याचे प्रयत्न केला. वारकर्यांवर लाठीहल्ला करूनही लाठीहल्ला झालाच नाही असा कांगावा सरकार करत आहे.