अजित पवारांपुढे ठपका पुसण्याचे आव्हान | पुढारी

अजित पवारांपुढे ठपका पुसण्याचे आव्हान

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर केलेली टीका आणि दोन कार्याध्यक्षांच्या नियुक्तीवर केलेल्या भाष्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या तंबूत जाऊन परत आलेल्या अजित पवारांना आपल्यावरील ठपका दूर करण्यासाठी शर्थ करावी लागेल, अशी मल्लिनाथी अग्रलेखातून करण्यात आली.

शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रात पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधण्यात आला. काही जण शरद पवारांनी ‘भाकरी फिरवली’ असे म्हणत असतील, तर त्यात दम नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. नागालँडमध्ये त्यांचे चार-पाच आमदार निवडून आलेत. राज्याबाहेर लक्षद्वीप येथे त्यांचा खासदार आहे. केरळ विधानसभेत त्यांचे एक-दोन सदस्य आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्व काही आटोपशीर आहे. मग एकाचवेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज काय पडली, असा सवाल ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांना फेररचनेतून वगळले. त्यामुळे ते दिल्लीतील कार्यक्रमातून निघून गेले वगैरे नेहमीच्या कंड्या पिकविण्यात आल्या.

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘खिलाडी’ आहेत. राज्याच्या बाहेर पडून काम करण्याचा त्यांचा पिंड नाही. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करावे ही आपलीच सूचना होती, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेवून आहे, असे नेहमीच सांगितले जाते. तसेच अडीच वर्षांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केल्याचा हा परिणाम. अजित पवार हे भाजपच्या तंबूत जाऊन परत आले हा त्यांच्यावर ठपका आहे. हा ठपका कायमचा दूर करण्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल, असा सल्ला ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून दिला. राष्ट्रवादीने केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, वाचायला शिका, वाचाल तर वाचाल, असे सुनावले.

Back to top button