पुरुषांची मक्तेदारी मोडीत; मुंबई काँग्रेसमध्ये ‘महिलाराज’! | पुढारी

पुरुषांची मक्तेदारी मोडीत; मुंबई काँग्रेसमध्ये ‘महिलाराज’!

मुंबई; राजेश सावंत : मुंबई काँग्रेसमध्ये ‘महिलाराज’ आले असून अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली पुरुषांची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरातील राजकीय भवितव्यासाठी झटणार्‍या मुंबई काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई काँग्रेसचे भवितव्य गेल्या काही वर्षांपासून धोक्यात आले आहे. काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी अनेकदा नेतृत्वामध्ये बदल केला, पण काँग्रेसला हवे तेवढे यश मिळालेले नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपदी दिवंगत मुरली देवरा असताना शरद काँग्रेसचे अस्तित्व दिसून येत होते. देवरा यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 22 वर्षे शहरात काँग्रेसने राज केले. त्यानंतर दिवंगत गुरुदास कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा चढता आलेख राहिला. कामत यांच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा खासदारांपैकी 5 खासदार काँग्रेसचे तर 1 खासदार राष्ट्रवादीचा निवडून आला होता. 2009 मध्ये झालेल्या विधानसभेतही काँग्रेसचे तब्बल 17 आमदार निवडून आले होते. मात्र 2014 पासून मुंबईतील काँग्रेसचे बुरुज ढासळू लागले. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे अवघे 31 नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसची मुंबईत होणारी पीछेहाट लक्षात घेऊन नेतृत्व बदलही करण्यात आले, पण काँग्रेसला यात फारसे यश आले नाही. मुंबई काँग्रेस भक्कम करण्यासाठी काँग्रेसमधील डॅशिंग नेते भाई जगताप यांच्यावर मुंबई काँग्रेसची जबाबदारी सोपवली, पण त्यांनाही फारसे यश मिळालेले नाही. मुंबई काँग्रेसच्या एकूणच कामगिरीबद्दल सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी नाराज होते. अखेर पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत मुंबई काँग्रेसची जबाबदारी थेट धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्यावर सोपवून मुंबईत महिलाराज आणले. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांनी मुंबई काँग्रेसची कार्यपद्धत या अगोदरच जाणून घेतली आहे. गायकवाड यांच्या निवडीमुळे अध्यक्षपदासाठी उत्सुक असलेले काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते नाराज झाले असले तरी, महिला कार्यकर्त्यांमध्ये मात्र खुशीचे वातावरण दिसून येत आहे. तर दुसरीकडे गायकवाड यांच्या निवडीमुळे काँग्रेसने दलित समाजालाही खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.
वरिष्ठ नेत्यांची जुळवून घ्यावे लागणार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पहिल्यांदाच महिलेच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. वर्षा गायकवाड यांना मानणारा काँग्रेसमध्ये मोठा वर्ग असून यात महिलांचा मोठा समावेश आहे, पण काम करत असताना त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदाहरणार्थ संजय निरुपम, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, सुरेश शेट्टी, भाई जगताप, चरण सिंग सप्रा, अमरजीत सिंह मनाहास, मधु चव्हाण व अन्य प्रमुख नेत्यांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

उमेदवारी देताना कस लागणार!

मुंबई काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी असून प्रत्येक लोकसभा मतदारसंघातच नाहीतर काही नेत्यांनी स्वतःचा गट निर्माण केला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटप करताना मोठी कस लागणार आहे. यात गायकवाड यशस्वी झाल्या तर मुंबईत पुन्हा काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात.

43 वर्षांतील अध्यक्ष

मुरली देवरा, गुरुदास कामत, कृपाशंकर सिंह, जनार्दन चांदुरकर, एकनाथ गायकवाड, भाई जगताप, वर्षा गायकवाड

Back to top button