आता मुंबईत कचऱ्यापासून बायोगॅस | पुढारी

आता मुंबईत कचऱ्यापासून बायोगॅस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका सहकार्याने महानगर गॅस बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करून दररोज एक हजार टन बायोगॅस निर्मिती करण्यात येणार आहे.

मुंबई दररोज ७ हजार ५०० मेट्रिक टन पेक्षा जास्त कचरा जमा होतो. त्यात डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपत आल्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी असा प्रश्न पालिकेसमोर आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात हॉटेल व दररोज १०० मेट्रिक टन कचरा जमा होणाऱ्या गृह संकुलांना त्यांच्याच आवारात खत प्रकल्प उभारून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली. त्यामुळे तब्बल २ हजार ५०० मेट्रिक टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे सध्या शहरात ४ हजार ५०० मेट्रिक टन कचरा तयार होत आहे. आता मुंबई महापालिका व महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्या.

बायोगॅस प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत याचे काम सुरू राहणार आहे. त्यात जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत उत्पादन संयंत्र आणि हरित इंधन उत्पादन संयंत्र या टप्प्यांचा समावेश असेल. या प्रकल्पाद्वारे उत्पादित केलेला जैविक वायू मुंबईच्या हद्दीत वापरला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जैविक कचरा देण्याचे नियोजन सुरू केल्याचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी सांगितले.

Back to top button