रेपो रेट जैसे थे; महागाईची तीव्रता कमी होण्याची शक्यता | पुढारी

रेपो रेट जैसे थे; महागाईची तीव्रता कमी होण्याची शक्यता

मुंबई, वृत्तसंस्था : व्याज दरात वाढ होईल की घट, याची धाकधूक असताना रिझर्व्ह बँकेने ताज्या पतधोरणात रेपो दरात कसलीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता महागाईची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीची गुरुवारी बैठक झाली. त्यात अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असलेले निर्णय घेतले गेले. त्यानंतर पत्रकार परिषदेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांनी या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, सलग दुसर्‍या पतधोरणात रेपो रेट जैसे थे म्हणजे 6.50 टक्केच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अर्थव्यवस्थेवर अजूनहीं महागाईचा ताण असल्याने आणखी काही काळ कठोर धोरण सुरू ठेवावे लागेल.

महागाई आटोक्यात

डॉ. दास म्हणाले की, महागाई बर्‍यापैकी आटोक्यात असून सध्या जरी 18 महिन्यातील सर्वात कमी म्हणजे 4.70 टक्के दरावर महागाई असली तरी रिझर्व्ह बँकेने ठेवलेले 4 टक्क्यांचे लक्ष्य गाठण्यास काही कालावधी जावा लागेल. 2023-24 या वर्षाचा विकास दर साडेसहा टक्क्यांच्या गतीने दिसत आहे; तर महागाई निर्देशांकाची सरासरी सध्या 5.1 टक्के आहे.

पाचशेच्या नोटा चलनात राहणारच

डॉ. दास म्हणाले की, आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्यानंतर आतापर्यंत 85 टक्के म्हणजे 1.8 लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. नोटा परत करण्याच्या मुदतीपर्यंत आम्ही ठेवलेले लक्ष्य गाठले जाईल.तसेच 500 रुपयांच्या नोटा मागे घेतल्या जाणार नाहीत आणि एक हजार रुपयांच्या नव्या नोटा आणल्या जाणार नाहीत, हेही स्पष्टपणे सांगण्यात आले.

Back to top button