लोकसभेनंतर भाजप शिंदे गटाला बाजूला करेल : भास्कर जाधव | पुढारी

लोकसभेनंतर भाजप शिंदे गटाला बाजूला करेल : भास्कर जाधव

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  आगामी लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकी भाजप एकट्यानेच लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गटाची अवस्था ना घर का, ना घाट का अशी होईल, असा दावा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत राज्यात जेमतेम सातच जागा जिंकता येतील, असा भाजपच्याच सर्वेक्षणातील गोपनीय अहवालात म्हटल्याचा दावाही जाधव यांनी केला.

शिवसेना भवन येथे रविवारी माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष तयारी करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसेना ठाकरे गटही कामाला लागला आहे. आमची तयारी दिसत नसली तरी आमचे काम सुरू आहे. महाविकास आघाडी एकत्र राहिली तर भाजपला लोकसभेच्या केवळ सात जागा त्याही अत्यंत कमी फरकाने जिंकता येतील. भाजपच्याच एका गोपनीय अहवालात तसा दावा केल्याचे भास्कर जाधव म्हणाले. भाजपच्या गोपनीय अहवालानुसार विधानसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात केवळ 49 जागा जिंकता येतील. तर, मुंबई महापालिकेतील त्यांच्या नगरसेवकांची संख्या 82 वरून केवळ 28 वर येणार असल्याचेही जाधव म्हणाले.

दुसर्‍या अहवालानुसार भाजप राज्यातील आगामी निवडणुकीत विधानसभेच्या जागा शिंदे गटाला सोबत न घेता लढणार आहे. 2014 साली भाजपने लोकसभा निवडणुकांवेळी उद्धव ठाकरे यांना सोबत घेतले होते. पण, विधानसभा निवडणुका मात्र एकट्याने लढविल्या. त्याचप्रमाणे आता लोकसभेला ते शिंदेंना सोबत घेतील आणि विधानसभेला बाजुला सारतील. त्यामुळे, शिंदे गटाची अवस्था ना घर का, ना घाट का अशी होईल, असेही भास्कर जाधव म्हणाले.

Back to top button