शैक्षणिक साहित्य २० टक्क्यांनी महागले | पुढारी

शैक्षणिक साहित्य २० टक्क्यांनी महागले

मुंबई; गणेश शिंदे :  दोन महिन्याच्या सुट्टीनंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा सुरु होणार असल्याने पालकांनी शनिवारी, रविवारी सुट्टीची संधी साधत बाजारपेठांमध्ये शैक्षणिक साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. सर्व प्रकारच्या साहित्यांच्या दरात सरासरी २० टक्के वाढ झाल्याने यंदा पालकांच्या खिशाला झळ बसणार असल्याचे दिसते.

मस्जिद बंदर, काळबादेवी परिसर, दादर या स्थानिक बाजारपेठेत शालेय साहित्याचे विक्रेते आहेत. हे व्यापारी वसई-विरार येथील घाऊक बाजारांतून तर भिवंडी येथील कारखान्यांतून शालेय साहित्य खरेदी करतात. शाळा सुरु होण्यास आठवडा राहिल्याने विशेषतः दादर बाजारपेठेत शालेय साहित्यासाठी पालकांची गर्दी होती. शनिवार व रविवार सुट्टीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडले होते.

यावर्षी नववी, दहावीची पुस्तके, वह्या, बॅग, कंपास पेटी, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली यांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनापुर्वी दर स्थिर होते. मात्र कोरोनानंतर कच्चा मालाच्या दरात झालेली वाढ व इंधनाच्या वाढलेल्या दराचा आर्थिक फटका विक्रेत्यांबरोबर पालकांना बसला आहे.

गिरगांव येथील स्टुडंट बुक डेपोचे विक्रेते परिन गंगर म्हणाले, नववी व दहावीसाठी लागणाऱ्या दोन्ही पुस्तकांचा विषयनिहाय संच उपलब्ध आहे. नववीचा संच हा गतवर्षी ४१९ रुपयांना मिळायचा. यात ८ पुस्तके असतात. तो आता ५२३ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दहावीच्या पुस्तकांचा संच हा ५७५ रुपयांवरुन ६६५ रुपये इतका झाला. त्यात ९ पुस्तके असतात.

काळबादेवी परिसरातील विक्रेते हिरालाल खंडेला म्हणाले, १०० पानांची वही २५ रुपये, २०० पानांच्या वहीची किंमत ३५ रुपये आहे. यंदा ५ ७ रुपये प्रति वहीमागे वाढले आहेत. १०० पानांची (लाँग बुक) ४० रुपये तर २०० पानांची ८० रुपयांना मिळत आहे. प्रत्येक लॉंग बुकमागे १० ते १५ रुपये यंदा वाढले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा दरात २० ते २५ टक्के वाढ झाली असल्याचे छबीलदास रोड, दादरचे विक्रेते दशरथ कुंभार यांनी सांगितले

पहिल्या लॉकडाऊनमध्ये पाच महिने शालेय साहित्य विक्रीचे दुकान बंद होते. त्यामुळे विक्रेत्यांचे सुमारे ७५ टक्के, तर दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ४० टक्के नुकसान झाले. मात्र; सरकारी कामासाठी लागणारे प्रिंटिंग पेपर, फोल्डर फाईल यांच्या मागणीमुळे विक्रेते तरले, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

अशा आहेत किमती

  • कंपास पेटी १२० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत
  • जेवणाचा डबा (प्लास्टिक) ८० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत
  • पाण्याची बाटली ८० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत
  •   दफ्तर ३०० रुपयांपासून ते ५०० रुपये, २२०० रुपये

Back to top button