राज्यात यंदा 515 लाचखोरांवर कारवाई | पुढारी

राज्यात यंदा 515 लाचखोरांवर कारवाई

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लाचखोरांवर धडक कारवाई करत असलेल्या राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या वर्षी मे अखेरपर्यंत 515 लाचखोरांवर कारवाई करत 361 गुन्हे दाखल केले आहेत. गेल्यावर्षीच्या जानेवारी ते मे महिन्याच्या तुलनेत सापळा कारवाईत 21 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. सोबतच एसीबीने गैरमार्गाने संपत्ती गोळा केल्याप्रकरणी अपसंपदेचे पाच तर, एकावर अन्यप्रकारे भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात एसीबीचे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड असे एकूण आठ विभाग आहेत. या विभागांच्या माध्यमातून एसीबीकडून कारवाई करण्यात येते. एसीबीने यावर्षी जानेवारी महिन्यात राज्यात 59 सापळा प्रकरणात 80 लाचखोरांवर कारवाई केली. तर, फेब्रुवारीत 75 सापळे रचून 111 जणांवर कारवाई केली. मार्च महिन्यात हा आकडा वाढून एसीबीच्या अधिकार्‍यांनी 88 सापळा कारवाई करुन 124 लाचखोरांवर गुन्हे दाखल केले. पूढील एप्रिल आणि मे महिन्यात एसीबीने अनुक्रमे 70 आणि 69 सापळा कारवाई करत एकूण 200 लाचखोर पकडले.

एसीबीने गेल्यावर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांत 297 सापळा प्रकरणांत 409 जणांवर कारवाई केली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कारवाईमध्ये 21 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एसीबीने राज्यात यावर्षी केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक नाशिक येथे 74 सापळे रचून 113 जणांवर कारवाई केली. त्या खालोखाल पूणे येथे 64, औरंगाबाद 63, ठाणे 49, अमरावती 39, नागपूर 35, नांदेड 35 आणि मुंबईत 17 कारवाई करण्यात आल्या आहेत.

मुंबईत अपसंपदेचे सर्वाधिक चार गुन्हे दाखल

एसीबीने राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत यावर्षी पहिल्या पाच महिन्यांत मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजेच 17 सापळा प्रकरणांमध्ये 20 जणांवर कारवाई केली आहे. सापळा कारवाई कमी झाल्या असल्या तरी एसीबीने मुंबईत सहा जणांविरोधात अपसंपदेचे चार आणि तीन जणांविरोधात अन्य भ्रष्टाचाराचा एक गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button