महाविकास आघाडी एकत्र राहिल असे वाटत नाही : प्रकाश आंबेडकर | पुढारी

महाविकास आघाडी एकत्र राहिल असे वाटत नाही : प्रकाश आंबेडकर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सद्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र राहिल असे वाटत नाही. कुठल्या तरी कारणाने भांडणे होऊन खेळखंडोबा होईल आणि यातून जमले नाही म्हणून वेगळे गेलो असे सांगायचे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. युती करायची किंवा नाही याचे उत्तर देवाकडेही नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आहे. कारण कठपूतलीप्रमाणे ते सर्वांना नाचवत आहेत, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्यावतीने कुर्ला येथे सत्ता परिवर्तन सभा आयोजित केली होती. या सभेला वंचितच्या कार्यकर्त्यांसह नागरीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या सभेला मार्गदर्शन करताना वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर भाष्य करताना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजपावरही निशाणा साधला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आदी प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते. महाविकास आघाडीने आम्हाला अद्याप बाहेर ठेवले आहे. आम्हाला बाहेर ठेवले तरी तुमचा जो काही समझोता आहे तो तरी करा, असे आवाहन करीत लोकसभेच्या 48 जागांचे वाटप तुम्ही कसे करणार, त्या जागावाटपासाठी तरी तुम्ही एकत्र या, असा सल्लाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला. उद्याच्या सत्तेचा निर्धार करायचा आहे. कुठल्यातरी युतीत आपण राहणार याबद्दल दुमत नाही, पण आपला निर्धार कायम ठेवला पाहिजे, जे येतील त्यांच्यासोबत नाहीतर त्यांना सोडून सत्तेची लढाई लढू, असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीने आम्हाला शिकवू नये!

ईडी हा सर्वांचा बाप आहे, या बापाने दोरी खेचायला सुरुवात केली तर राष्‍ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण बाहेर पळायला सुरुवात करतील, असे सांगतानाच आज आम्ही जेथे आहोत तेथेच आहोत. आम्हाला शहाणपणा शिकवू नका, नाहीतर तुमच्या अनेक गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. तुम्ही तुरुंगात जावे असे आम्हाला वाटत नाही, पण नवाब मलिक यांची अवस्था बघा, असा इशाराही आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.

मोदींनी खुलासा करावा!

नव्या संसदेचे उद्घाटन होत असताना दुसरीकडे देशाचा खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करणाऱ्या खेळाडूंचे धिंदवडे काढले जात आहेत, त्यांचे शोषण केले जात आहे. त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जात नाही. या खेळाच्या जगात दुजाभाव चालला असून देशाचा गौरव उंचावणाऱ्या खेळाडूंवर होणाऱ्या अन्यायाचा आंबेडकर यांनी निषेध केला. तसेच अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करणार का, असा सवालही त्यांनी केला. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मोदी कोणतेही निमंत्रण नसताना भेटायला गेले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत कोणकोण होते, हे मोदींनी जाहिर करावे, असे आव्हान आंबेडकर यांनी दिले. मोदी आणि भाजप धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नसून त्यांच्याही अनेक गोष्टी आम्हाला माहित आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.

Back to top button