परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला ‘नकारघंटा’ | पुढारी

परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला 'नकारघंटा'

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गेल्या पाच वर्षात केवळ ६६८ परदेशी विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्याचे दिसून आले आहे. माहिती कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी माहिती अधिकारात परदेशी विद्यार्थ्यांची माहिती मागवली होती.. यातून ही माहिती समोर आली आहे.

विद्यापीठाने दिलेल्या माहितीत २०१८-१९ मध्ये १६६, २०१९-२० मध्ये १६९, २०२०-२१ मध्ये १०१ तर २०२१-२२ मध्ये ११२ विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ व त्याच्याशी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेतला. २०२२-२३ मध्ये १२० परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मुंबई विद्यापीठातील प्रवेशाकडे पाठ फिरवली असली तरी मुंबईतील आयआयटी, नरसी मोनजी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स या शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेण्यासाठी परदेशी विद्यार्थी कानाडोळा करत आहेत. सेंट झेवीयर कॉलेजमध्ये २०१८-१९ व २०१९-२० मध्ये जास्तीत जास्त परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. कोरोना लॉकडाउन काळात सेंट झेवियर्समध्ये १६ परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्समध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व २०१९-२० मध्ये २१ टक्के परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र, गेल्या दोन वर्षात या महाविद्यालयात परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. भवन्स, डॉन बास्को कॉलेज, हिंदुजा कॉलेज कांदिवली एज्युकेशन सोसायटी, सेंट अँड्रयू कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स व कॉमर्स या महाविद्यालयांचे आकर्षण आहे.

Back to top button