सहकारी संस्थांमध्ये अक्रियाशील सदस्यांची लुडबुड होणार बंद | पुढारी

सहकारी संस्थांमध्ये अक्रियाशील सदस्यांची लुडबुड होणार बंद

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक होण्यासाठी जे सदस्य पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अधिमंडळाच्या किमान एका बैठकीला उपस्थित राहत नाहीत. तसेच, सहकारी संस्थेच्या सेवांचा कोणताही लाभ घेत नाहीत, अशा सर्व सहकारी संस्थांमधील सदस्यांना अक्रियाशील सदस्य म्हणून समजण्यात येणार आहे, असे सभासद संस्थेचा पदनिर्देशित अधिकारी म्हणून निवडून येण्यास स्वीकृत किंवा नामनिर्देशीत करण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

सहकारी संस्थांमध्ये अक्रियाशील सदस्यांना निवडून येण्यास किंवा स्वीकृत म्हणून जाण्यास प्रतिबंध करण्याचा तसेच क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट करण्याच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २ मधील खंड (१९) मधील उपखंड (अ- १) मधील क्रियाशील सभासदाची व्याख्या, कलम २६ मध्ये अक्रियाशील सभासदाची तरतूद होती. कलम २७ मध्ये सभासदास मतदानाच्या अधिकाराची तरतूद व त्यानुषंगाने, कलम ७३ अ मधील अक्रियाशील सभासदास संस्थेचा पदनिर्देशित अधिकारी होण्यास प्रतिबंध करण्याची तरतूद २८ मार्च, २०२२ रोजीच्या राजपत्रान्वये वगळण्यात आली होती.

यामुळे जे सभासद ५ वर्षांच्या कालावधीत सर्वसाधारण सभेच्या किमान एका बैठकीस उपस्थित राहणार नाहीत. तसेच संस्थेच्या उपविधीनुसार विहित केलेल्या सेवांचा वापर करणार नाहीत, अशा सर्वच सभासदांना मतदानाचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार प्राप्त झाला होता.

एकाही बैठकीला उपस्थित नसलेल्यांना अक्रियाशिल सदस्य समजणार

  •  जे सदस्य पाच वर्षांच्या कालावधीमध्ये अधिमंडळाच्या किमान एका बैठकीला उपस्थित राहत नाहीत तसेच, संस्थेच्या उपविधीमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे सहकारी संस्थेच्या सेवांचा कोणताही लाभ घेत नाहीत अशा सर्व सहकारी संस्थांमधील सदस्यांना अक्रियाशील सदस्य म्हणून समजण्यात येईल. जो क्रियाशील सदस्य संस्थेच्या कामकाजात सहभागी होण्यास आणि वेळोवेळी किमान मर्यादेपर्यंत सेवांचा वापर करण्यास कसूर करील, तो सदस्य क्रियाशील सदस्य असण्याचे बंद होऊन आणि तो मतदानास पात्र ठरणार नाही.

Back to top button