ऑनलाईन फसवणूक! व्यवहार करताना घ्या 'ही' काळजी | पुढारी

ऑनलाईन फसवणूक! व्यवहार करताना घ्या 'ही' काळजी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कोरोना काळापासून डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रोख रकमेच्या व्यवहारांच्या तुलनेत डिजिटल व्यवहार करणे तुलनेने सोपे आहेत. परंतु, हे व्यवहार करताना जराही दुर्लक्ष झाले तर मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. २०२२ मध्ये ९५ हजारांपेक्षा जास्त युपीआय गैरव्यवहार झाल्याची माहिती सरकारी अहवालात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे युपीआयवरील तांत्रिक कारण किंवा त्रुटी यामुळे हे गैरव्यवहार झालेले नाहीत. तर त्यांना संबंधित ग्राहकच जबाबदार आहेत. ग्राहकांनी दाखवलेला निष्काळजीपणा, दुर्लक्ष किंवा एखाद्या बाबीची परिपूर्ण माहिती नसल्याने हे गैरव्यवहार झाले आहेत. या पार्श्वभूमिवर आम्ही आपल्यासाठी ऑनलाईन फसवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आठ प्रमुख प्रकारांची माहिती घेऊन आलोय. सायबर गुन्हेगार या पद्धतींचा वापर करुन जास्तीत जास्त ग्राहकांची फसवणूक करतात.

 क्युआर कोड : क्युआर कोडच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत, असे सायबर गुन्हेगार ग्राहकाला सांगतात. त्यानंतर ग्राहक क्युआर कोड स्कॅन करतो. युपीआय पिन टाकतो. हा पीन शेअर केला तर पैसे मिळण्याऐवजी ग्राहकाच्या खात्यातून वजा होतात. त्याची माहिती लगेच ग्राहकांना मिळतही नाही. त्यामुळे एखादा क्युआर कोड स्कॅन केल्यावर त्यावरील माहिती नीट वाचा.

व्यक्तीची खात्री करणे : युपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवताना संबंधित व्यक्तीची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा सायबर गुन्हेगार ते कस्टमर केअर एक्झिकेटिव्ह किंवा नातलग असल्याचे भासवतात. त्यांच्यावर ग्राहकांनी विश्वास दाखवला की, लगेच फसवणूक करतात.

गुगल सर्च : गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधताना अतिशय काळजी बाळगणे आवश्यक आहे. बऱ्याचदा चुकीच्या कस्टमर केअर क्रमांकाला फोन केल्यावर असे गुन्हे घडतात. सायबर गुन्हेगार चुकीचे कस्टमर केअर नंबर गुगलवर पेरुन ठेवतात.

पिन बदलणे : बरेच ग्राहक युपीआय पिन सातत्याने बदलत नाहीत. प्रत्येक वेळी नवा पिन लक्षात ठेवणे कठिण असल्याने बरेच ग्राहक जुना पिन कायम ठेवतात. याप्रमाणेच ऑनलाईन पासवर्डही बदलत नाहीत. त्यातुनही असे गैरव्यवहार घडतात.

 पिन शेअर करणे युपीआय : पिन कुणालाही सांगायला नको. अनोळखी व्यक्तीला युपीआय पिन शेअर केल्यानंतर गैरव्यवहार घडण्याचे प्रमाण वाढते. युपीआय पिनच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार तुमच्या अकाऊंटमधून पैसे लांबवतात.

सार्वजनिक वायफाय :  बरेच नागरिक ऑनलाईन व्यवहार करताना सार्वजनिक वायफायचा वापर करतात. या माध्यमातूनही गैरव्यवहार होतात. ऑनलाईन व्यवहार करताना शक्यतोवर खासगी नेटवर्क वापरा.

अनोळखी लिंक : अनोळखी व्यक्तीने पाठविलेले ईमेल्स किंवा लिंक यावर लगेच क्लिक करु नका. आधी संपूर्ण माहिती घ्या. त्यानंतर एखादी लिंक किंवा ईमेल उघडा. या माध्यमातून सुद्धा बरेच ऑनलाईन गैरव्यवहार होतात.

ॲप डाऊनलोड करणे : सायबर गुन्हेगार टीमव्हिवर, एनीडेस्क, क्विक शेअर सारखे ॲप डाऊनलोड करायला सांगतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाची खासगी माहिती घेऊन फसवणूक केली जाते.

 

Back to top button