काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत | पुढारी

काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवर वेगवेगळे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मात्र स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवर उमेदवार देण्याच्या द़ृष्टीने चाचपणी केली जात आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले. कोणत्या मतदारसंघात पक्षाची ताकद किती आहे, हे जाणून घेण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार आणि प्रमुख नेत्यांची मुंबईत 2 आणि 3 जून रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेस स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याने महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून विधानसभा आणि लोकसभेच्या जागांवर दावे-प्रतिदावे केले जात होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीत त्यासंदर्भात वक्तव्ये करू नयेत, असे ठरले होते. त्यानंतरही महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांकडून दावे-प्रतिदावे सुरूच आहेत.

दरम्यान, प्रदेश काँग्रेसमधील बदलाबाबत गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत मीच प्रदेशाध्यक्षपदावर राहणार आहे, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी बोलून दाखवला. राज्यातील काही नेते दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना भेटले. त्यांच्या भेटीचा आणि प्रदेशाध्यक्षपदाचा विषय याचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

पुण्यातील जागेवर काँग्रेसचा दावा

पुणे लोकसभेची जागा मेरिटनुसार काँग्रेसचीच आहे, याचा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या जागेचा निर्णय मेरिटनुसारच झाला पाहिजे, असे म्हटले आहे. त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

Back to top button