विधानसभा अध्यक्षांनी मागवली शिवसेनेची घटना

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी १६ अपात्र आमदारांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत दिलेले पत्र यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची घटना मागवली आहे.
न्यायालयाने सत्तासंघर्षावर निकाल देताना शिंदे सरकार आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले होते. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेले निमंत्रण अयोग्य असून शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची केलेली नियुक्ती नियमबाह्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी विनंती केली आहे.
आमचीच खरी शिवसेना असल्याचे दावे शिंदे आणि ठाकरे गटांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे जुलै २०२२ पूर्वी हा पक्ष नेमका कोणाच्या ताब्यात होता, याबाबतची तपासणी आणि अभ्यास करण्यासाठी नार्वेकरांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची घटना मागवली आहे. ठाकरे गटाकडून तातडीने निर्णय घेण्यासाठी कितीही मागणी केली तरी विधानसभा अध्यक्ष घाईघाईत निर्णय घेणार नाहीत, अशी माहिती विधान भवनातील अधिकाऱ्याने दिली.
कालावधीबाबत अनिश्चितता
मूळ शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्यासाठी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना निश्चित असा कालावधी दिलेला नाही. त्यामुळे निर्णय घाईत न घेता ठाकरे आणि शिंदे गटांतील ५४ आमदारांना विधानसभा अध्यक्ष नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतील. शिवाय शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार हे सध्या सांगता येणार नाही. त्यामुळे अपात्रतेबाबत निर्णय देण्यासाठी किती कालावधी लागेल हे निश्चित नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.