मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार गारेगार | पुढारी

मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार गारेगार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  उपनगरीय रेल्वे मार्गावरील साधी लोकल लवकरच इतिहासजमा होणार असून त्याजागी संपुर्ण एसी असलेल्या भारतीय बनावटीच्या वंदे भारत मेट्रो उपनगरीय गाड्या येणार आहेत. रेल्वे बोर्डाने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला २३८ वंदे भारत मेट्रो खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे. यामुळे येत्या काही वर्षात मुंबईकरांचा संपूर्ण लोकल प्रवास गारेगार होणार आहे.

लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने काही वर्षापुर्वी रेल्वेला बंद दरवाजाच्या लोकल चालविण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार रेल्वेने एसी लोकल चालविण्याचा निर्णय घेतला. परंतु तिकिद दर साध्या लोकलच्या तुलनेत जास्त असल्याने सुरुवातीला प्रवाशांचा एसी लोकलला विरोध होता. मात्र एसी लोकलच्या तिकिद दरात ५० टक्के कपात केल्यानंतर मुंबईकर आरामदायी प्रवासाकडे वळू लागले आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट – ३ आणि ३ ए अंतर्गत २३८ एसी लोकल खरेदी करण्यात येणार आहे. या गाड्या मेक इन इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात येणार आहेत. याकरिता २० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

या एसी लोकलच्या देखभाल- दुरुस्तीसाठी वानगाव आणि भिवपुरी येथे दोन नविन कारशेड उभारण्यात येणार आहेत. या २३८ एसी लोकलकरिता एकच निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाने एमआरव्हीसीला दिल्या आहेत. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरु करण्याचे एमआरव्हीसीने नियोजन आहे.

Back to top button