ब्रिगेडियर सुजित पाटील मेजर जनरलपदावर

ब्रिगेडियर सुजित पाटील मेजर जनरलपदावर

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या ब्रिगेडियर सुजित पाटील यांची मेजर जनरलपदावर पदोन्‍नती झाली. ते सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असून, लष्करातील सर्वात युवा मेजर जनरल ठरले आहेत.

विभागाचा कार्यभार त्यांच्याकडे 10 जुलैपासून देण्यात आला आहे. कराड तालुक्यातील मसूर हे मूळ गाव असलेल्या शिवाजी व छाया पाटील यांचे सुपुत्र सुजित पाटील यांनी पुण्यातील विद्या भवन हायस्कूल येथे शालेय शिक्षण, तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. 1986 साली एनडीएमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आणि 1989 सालापासून जम्मू-काश्मीर रायफल्स रेजिमेंटमध्ये त्यांनी सेवा दिली.

2007 साली त्यावेळी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कारगिल लढाईत नाव कमावलेल्या लडाख स्काऊट रेजिमेंटमध्ये त्यांची निवड करण्यात आली. काश्मीरमधील अनेक दहशतवादविरोधी मोहिमांचे नेतृत्व सुजित पाटील यांनी केलेले आहे. त्यांचे ले. जनरल असित मिस्त्री यांच्याकडून खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये सौ. सोनाली पाटील यांच्या उपस्थितीत प्रमोशन करण्यात आले.

सर्व प्रकारच्या भूभागात काम केलेल्या पाटील यांना अतिउंचावर असलेल्या ईशान्य भारतातील दीर्घ अनुभव आहे. लडाख स्काऊटच्या बटालिन तसेच डेझर्ट क्षेत्रात इन्फंट्री ब्रिगेडचे सफल नेतृत्व त्यांनी केले आहे. लष्कराच्या मुख्यालयातही त्यांनी सेवा बजावलेली आहे. मेजर जनरलपदावर येण्यापूर्वी पाटील यांच्याकडे एनडीएमधील पायाभूत सुविधांचा विकास, कॅडेट्सच्या सुविधेत वाढ करणे आदी जबाबदार्‍या होत्या. कोव्हिडच्या संकटकाळातही अ‍ॅकॅडमी पूर्णपणे चालू ठेवून 2,000 कॅडेट्स तसेच स्टाफच्या सुरक्षेची काळजी वाहण्याचे काम त्यांनी केले.

पुणे महापालिका आयुक्‍त रुबल अगरवाल तसेच डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांच्या एनजीओच्या सहकार्याने त्यांनी कोव्हिडविरोधी लसीकरण मोहीम एनडीएमध्ये राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

'क्लीन एनडीए, ग्रीन एनडीए' ही मोहीमही त्यांनी कॅप्टन एस. एस. वैद्य (भारतीय नौदल), डॉ. समीर जोशी व डॉ. मेधा ताडपत्रीकर यांच्यासोबत राबविली होती. तसेच नाम फाऊंडेशन व ग्रीन थंब यांच्या सहकार्याने एनडीएमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी अनेक उपक्रम राबविले.

logo
Pudhari News
pudhari.news