मोठी बातमी! कुख्यात गँगस्टर अबु सालेमचा पुतण्या आरीफ गजाआड | पुढारी

मोठी बातमी! कुख्यात गँगस्टर अबु सालेमचा पुतण्या आरीफ गजाआड

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमचा (Gangster Abu Salem) पुतण्या मोहम्मद आरीफ (Mohammad Arif) याला उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) वांद्रे, हिल रोड परिसरातून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. बनावट कागदपत्रे तयार करुन जमीन हडपणे आणि खंडणी मागणे असे आरोप आरीफवर आहेत.

उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात असलेली एक जमीन बनावट कागदपत्रे तयार करुन हडप करत खंडणीची मागणी केल्याची तक्रार शबाना परवीन नावाच्या महिलेने केली आहे. त्यानुसार आझमगढ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आरीफला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी उत्तरप्रदेशमध्ये आणल्याचे उत्तरप्रदेशचे विशेष पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले.

आझमगढ पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी हेना, तिचा पती सलाम आणि आरीफ यांनी शबाना परवीन यांची वडिलोपार्जित जमीन जबरदस्तीने हडप केली. तिघांनीही या मालमत्तेवर कब्जा करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. तसेच तिघांनीही संगनमताने खंडणीची मागणी केल्याचा आरोप यात ठेवण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भादंवि कलम ३८६, ४२० आणि ४६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आरीफ हा मुंबईतील वांद्रे परिसरात असल्याची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांना मिळाली. त्यानुसार, उत्तरप्रदेश पोलिसांनी मुंबईत येऊन एक स्पेशल ऑपरेशन राबवत वांद्रे येथील हिल रोड परिसरात एका टपरीवर चहा पिताना आरीफला ताब्यात घेतले. गॅंगस्टर अबु सालेम याचा मोठा भाऊ अब्दुल हकीम याचा आरिफ हा मुलगा आहे.

Back to top button